Friday 13 March 2009

जिजाबाई भोसले

जिजाबाई (१५९४-१६७४) ही सिंदखेडच्या लखुजी जाधवांची कन्या। जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. इ.स. १६०५ मध्ये जिजाबाई आणि शहाजीराजांचा विवाह झाला.

पुढे लखुजी जाधव व शहाजी राजे यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला असता, जिजाबाई आपल्या पतीशी कायम एकनिष्ठ राहिल्या। नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता.

जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती। त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.

राजांचे संगोपन आणि कुशल कारभार
शिवाजीराजे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली। अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. दादोजी कोंडदेव व इतर कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले.

निजामशाही, अदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती। अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेवांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. त्यांच्यावर संस्कार घडवले.

आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत. राजांना घडवताना त्यांनी फक्त रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.

राजांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नात जिजाबाईंच्या प्रेरणेचा खूप मोठा हातभार होता।

जीवन

शहाजी राजांनी बंगळूरात तुकाबाईंशी दुसरे लग्न केल्यावर जिजाबाईंच्या वाटयाला फारसे पती प्रेम व राजांच्या वाटयाला पिताप्रेम आले नाही। परंतु आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.


राजांच्या प्रथम पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते। त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठींबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज सोयरिक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.

राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत। त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहावत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.

शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेका नंतर थोडयाच दिवसांत, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले

शहाजीराजे भोसले

पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व!

जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मिळून निजामशाही संपवली, त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला, व जणू स्वत:वरच छत्र धारण केले। ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ 3 वर्षे टिकला होता. या प्रसंगातून छत्रपती शिवाजी महाराजांची तल्लख बुद्धी, पराक्रम, रयतेचे पालनपोषण करण्याची जबाबदारीची भावना, चारित्र्य याप्रमाणेच स्वराज्यसंकल्पना हे सर्व घटक आनुवंशिकतेने शहाजीराजांकडून त्यांच्या अंगी आले होते असे निश्र्चितपणे म्हणता येते.

फार वर्षांपूर्वी राजस्थानच्या चितोडगडच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला। पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसल्यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा 1603 साली विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.

दरम्यान अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतवर्षातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या। निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते (इ. स. 1624). त्यांना त्यात यश मिळाले. शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. पण पुढे मलिक अंबरची दरबारातील राजकारणी वागणूक पाहून शहाजीराजे आदिलशाहीत गेले. त्यानंतर 1639 साली आदिलशहाकडून सरलष्कर ही पदवी त्यांना देण्यात आली व बंगळूरची जहागिरीही त्यांना प्राप्त झाली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता.

शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला। शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. ते मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणूनच त्यांनी योग्य वेळ पाहून पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवले होते. त्याचबरोबर श्यामराज रांझेकर, बाळकृष्णपंत हणमंते, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांना जय्यत तयारीनिशी शिवाजी महाराजांसोबत राज्यकारभारासाठी पाठवले होते. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली.

दरम्यानच्या काळात आदिलशहाचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, मंबाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले। साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता 25 जुलै, 1648 चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वत: आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि. 16 मे, 1649 रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.

शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही, मुघलशाही व निजामशाही - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले। त्यांच्या कारकीर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे,
इ। स. 1625 ते 1628 - आदिलशाही इ. स. 1628 ते 1629 - निजामशाही इ. स. 1630 ते 1633 - मुघलशाही इ.स. 1633 ते 1636 - निजामशाही इ.स. 1636 पासून पुढे - आदिलशाही

पुढे 1661-62 दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते। त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध 5, म्हणजेच 23 जानेवारी,1664 रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

एक शूर मराठा सरदार. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीराजाचे पिता व राजमाता जिजाबाई यांचे यजमान।

शिवाजी महाराजांची थोरवी

वस्तुनिष्ठ भूमिकेवरून विचार केला तरच शिवाजीमहाराजांच्या थोरवीचे आकलन होईल। त्यांनी स्वराज्यसंस्थापना केली याचा अर्थ त्यांनी मुसलमानांचे वर्चस्व नाहीसे केले. युरोपीय व्यापार्‍यांच्या वखारी लुटल्या आणि जाळल्या याचा अर्थ त्यांच्या आक्रमक वृत्तीला पायबंद घातला. ते लोकोत्तर पुरूष होते याविषयी वाद असण्याचे कारण नाही. जगातील कोणत्याही विभूतीच्या अंगी आढळणारे अनेक असाधारण गुण त्यांच्या ठायी एकत्रित झाले होते. लहानपणापासून नाना प्रकारची संकटे सोसल्यामुळे त्यांना जगाचा विशेष अनुभव होता आणि त्याचा योग्य उपयोग करून घेण्याची बुद्धी स्वभावात:च त्यांच्या ठिकाणी होती. त्यांची राहणी साधी होती. त्यामुळे शिपाईगड्यांत त्यांच्यासंबंधी आपुलकी होती. त्या बळावर त्यांनी आपल्याभोवती जीवास जीव देणारे असंख्य मित्र गोळा केले होते.

महाराज नीतिमान होते। त्यांना कोणतेही व्यसन नव्हते. शत्रूच्या स्त्रियांना त्यांनी सुखरूपपणे त्यांच्या घरी पोहोचविल्याचे प्रसंग त्यांच्या चरित्रात आहेत. आपल्या आचरणाने त्यांनी प्रजेला नीतीचा धडा शिकविला होता. त्यांच्या राजनीतीत शक्ती व युक्ती या दोहींचा समन्वय होता. ते जसे शूर योद्धे होते तसे बुद्धिमान मुत्सद्दी होते. ध्येय आणि व्यवहार यांची सांगड घालण्याचे कौशल्य त्यांना साधले होते.

त्यांची धर्मावर नि:सीम श्रद्धा होती। धर्मभावना त्यांच्या अंत:करणात सदैव जागृत होती. राष्ट्रोन्नती धर्मोन्नतीवर अवलंबून आहे अशी त्यांची दृढ धारणा होती. तिच्या अनुषंगाने त्यांची सारी कार्ये होत. राज्यव्यवहाराबाबत त्यांचा स्वभाव अत्यंत कडक होता. गुन्हेगाराला ते जबरदस्त शिक्षा दिल्याशिवाय राहात नसत. प्रतापराव गुजरांवरचा त्यांचा राग इतिहासात नमूद आहे. कारभारात महाराज कडक असले तरी मुळात ते अंत:करणाने कोमल व दयाशील होते.

त्यांनी पैसा गोळा केला। कारण सैन्य ठेवण्यास पैसा उभारावा लागतो. आणि सैन्याशिवाय शत्रूला तोंड देता येत नाही. त्यांनी थोड्या पैशांत व थोड्या खर्चात फौजफाटा व गड, किल्ले यांची अत्यंत उत्तम व्यवस्था ठेवली. अडाणी मावळ्यांना त्यांनी हाताशी धरले व स्वराज्यस्थापनेचे कार्य केले. यात त्यांची योजकता व्यक्त होते. त्यांच्या पश्चात हे कार्य कुणास साधले नाही. कारण मराठ्यांशी जशी परंपरा ऐकू येते तशी मावळ्यांची परंपरा ऐकू येत नाही. या वस्तुस्थितीचा कदाचित आनुवंशिकतेशी संबंध असावा.

राज्यकारभारात महाराज सदैव सावध होते। त्यांचे हेरांचे खाते होते. त्यांच्या हेरांत बहिर्जी नाईक प्रसिद्ध आहे. कारभार चालविण्यासाठी त्यांनी अष्टप्रधान नेमले होते. त्यांच्यात कामाची वाटणी करण्यात आली होती, त्यांची शिस्त अत्यंत कडक होती. त्यांनी जिंकलेल्या मुलुखावर चौथाई म्हणून एक नवीन हक्क बसविला. त्या चौथाईच्या उत्पन्नावर जिंकलेल्या प्रदेशाच्या संरक्षणाचा आणि फौजेच्या इतर खर्चाचा भार असे. तिच्यावरून इंग्रजांना तैनाती फौजेची कल्पना स्फुरली होती. महाराजांची फौज किती शिस्तबद्ध होती याची साक्ष त्यांचे हे पत्र देईल.

पावसाळ्याच्या तोंडी त्यांनी सैन्याला ताकीद दिली आहे, ''पावसाळ्याकारणे पागेस सामा व दाणा व वरकड केला होता तो कित्येक खर्च होऊन गेला। परंतु जरूर जाले त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसीतैसी पागेची बेगमी केली आहे। असेल तोवरी धुंदी करून चाराल. मग पडत्या पावसात काही मिळणार नाही. उपास पडतील. घोडी मरावयास लागतील. म्हणजे विलातीस तसवीस देऊ लागाल. तरी रयतेस काडीचा आधार द्यावयाची गरज नाही. घलक पागेचे आहेत, खण धरून राहिले असतील, कोणी आगट्या करतील, कोणी भलतेच जागा चुली रंधनाला करतील, कोणी तंबाकूला आगी घेतील. गवत पडले आहे ऐसे अगर वारे लागले आहे ऐसे मनामन आणिता म्हणजे अविस्त्राच एखादा दगा होईल. रात्रीस दिवा घरात असेल, अविस्त्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. बदनामी ज्यावर येईल त्यास, मराठियाची तो इज्जत वाचणार नाही.

- भवानीशंकर पंडित
(महाराष्ट्राच्या जीवनातील स्थित्यंतरे पुस्तकातून साभार)

Monday 2 March 2009

।।शिवकल्याण राजा।।

निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।

नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।

यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।

आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।

धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।सावधपणे नृपवर तुच्छ केले।।

देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।

हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलीया भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।

महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।कित्येक दृष्ट संहारली।

कित्येकासी धाक सुटला ।कित्येकाला आश्रयो जाहला

।शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।

शिवकाळात स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे समर्थ रामदास यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे महानतम व युगप्रवर्तक असे व्यक्तिमत्त्व उपरोक्त परिपूर्ण, आशयघन व वजनदार अशा शब्दांत तोलले आहे। छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाच्या व कार्यकर्तृत्वाच्या प्रत्येक पैलुचा उल्लेख या कवनात केलेला आहे.

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं, त्या काळी 5 पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी। सुमारे 300 वर्षे महाराष्ट्र पारतंत्र्यात, गुलामगिरीत खितपत पडला होता. दिल्लीचे मुघल, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह यांच्या अत्याचाराने इथली गरीब जनता भरडली जात होती. साम्राज्यवादाने झपाटलेल्या सुलतानी आक्रमणांमुळे इथली घरे-दारे, पीक-पाणी, बायका-पोरी सुरक्षित नव्हत्या. याच काळात शहाजीराजे भोसले व जिजामाता यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी, 1630 रोजी, (संदर्भ : श्री राजा शिवछत्रपती, गजानन मेहेंदळे, डायमंड पब्लिकेशन्स) पुणे जिल्ह्यातील, जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला. वडिलांचा जाहगिरीचा प्रदेश बंगळूरचा (कर्नाटक) असल्यामुळे शिवबांची जडण-घडण त्यांच्या आई जिजाबाईंच्या सहवासात व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाली. रामायण, महाभारत या गोष्टींचे शिवबांवर लहानपणापासून संस्कार झाले. या गोष्टींच्याच माध्यमातून त्यांची स्वराज्य प्रेरणा जिजाबाईंनी जागृत केली. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र यांचा अभ्यास त्यांनी लहानपणीपासून मोठ्या कुशलतेने केला. त्याचबरोबर लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी याबाबतीतही शिवबा पारंगत झाले.

मुरार जगदेवाने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवल्यानंतर त्या जाहगिरीचा ताबा जिजाबाईंनी घेतला। जिजाबाईंनी त्याच ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवून, लोकांना एकत्र करून पुन्हा पुणे हे गाव वसवलं. याच काळात जाहगिरीच्या कारभाराच्या निमित्ताने शिवाजी राजांचा संबंध इथल्या 12 मावळांमध्ये आला. या ठिकाणीच त्यांना प्रथम बालमित्र व नंतर स्वराज्याचे शिलेदार मिळाले. या काळातच त्यांचे नेतृत्वगुणही फुलायला लागले. एका स्त्रीवर अत्याचार करणार्‍या एका गावाच्या पाटलाला त्यांनी हात-पाय तोडण्याची शिक्षा याच काळात सुनावली. आपल्या दक्ष न्यायव्यवस्थेचे उदाहरण रयतेसमोर ठेवले व स्वराज्याच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारण्यास ते समर्थ असल्याचेही सिद्ध केले. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी रायरेश्र्वराच्या पठारावर शिवलिंगाला स्वत:च्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली. या वेळी सोबत त्यांचे जिवाभावाचे सवंगडी-मावळे होतेच. तोरणा जिंकून त्यांनी जणू स्वराज्य स्थापनेचे तोरणच बांधले. तोरण्यानंतर पुरंदर काबीज करणे, फत्तेखानाबरोबरची लढाई यामुळे शिवरायांचा आत्मविश्र्वास व निर्धार या दोन्ही गोष्टी वाढत गेल्या. पण त्यांची खरी परीक्षा झाली ती शहाजीराजांना कैद झाली त्या वेळी! शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या सूत्राचा उपयोग करून, दिल्लीच्या बादशाहकरवी आदिलशाहवर दबाव आणून त्यांनी आपल्या मुत्सद्दी राजकारणाचे दर्शन घडवले.

त्यानंतरच्या काळात अफझलखानाच्या रूपाने महाराष्ट्रावर खूप मोठे संकट आले। हजारो गावे खानाच्या सैन्याने जाळली, हजारो मंदिरं नष्ट केली आणि रयतेवरही खूप अन्याय केले. पण महाराजांनी न घाबरता, न डगमगता त्याचा सामना करण्याचे ठरवले. स्वराज्याचे आपण पालक आहोत ही भावना प्रबळ होत गेली. त्यातच कान्होजी जेधे व इतर अनेक सरदारांनी केलेला त्याग व पराक्रम यातून कृतज्ञतेची आणि जबाबदारीची भावना प्रबळ होत गेली. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून इतिहासात नवा अध्याय लिहिला. ‘अफझलखान चाल करून आला, त्याला महाराजांनी शिताफीने प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीला बोलावले आणि धाडसाने खानाला संपवले.’ - या वाक्यांमध्ये महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा, अभ्यासकांना आश्र्चर्य वाटेल असा आणि आजही मार्गदर्शक ठरेल असा मोठा इतिहास सामावलेला आहे. खानाला भेटतानाचा गणवेश, खानाचा देह (उंची, जाडी), स्वत:ची उंची, `काय झाल्यास काय करायचे' याच्या पर्यायांचा अभ्यास, सोबतीच्या माणसांची निवड, खानाचा खात्मा केल्यानंतर त्याच्या सैन्याचा पराभव करण्यासाठीचे नियोजन, त्यासाठीचा गनिमी कावा, मोहीम अयशस्वी झाली अन्‌ खुद्द शिवरायांना दगाफटका झाला तर पुढे काय करायचे याचे पूर्ण नियोजन - या सर्व घटकांचा तपशीलवार विचार महाराजांनी त्या प्रसंगी करून ठेवला होता. शाहिस्तेखानाची पुण्यात लाल महालात कापलेली बोटे, पुढील काळात आग्र्याहून केलेली सुटका हे सुप्रसिद्ध ऐतिहासिक प्रसंगही छत्रपती शिवरायांच्या गुणांची साक्ष देतात.

स्वराज्याची सीमा दक्षिणेत तुंगभद्रेपर्यंत तर उत्तरेत सातपुड्यापर्यंत त्यांनी नेली होती। लढाईच्या काळात त्यांनी कधी रयतेला त्रास दिला नाही, की मराठी सैन्याने कुणाच्या स्त्रियांवर अत्याचार केला नाही. स्वत:च्या सैन्यासमोर त्यांनी आदर्श ध्येयवाद, नीतिमूल्ये व स्वराज्यनिष्ठा ठेवल्यामुळे मराठी सैन्यामध्ये सदैव आवेग, आवेश आणि उत्साहाचे वातावरण असायचे!

स्वराज्यनिष्ठा व पराक्रम यांसह सैन्य उभे करणे, विविध आक्रमणांना तोंड देणे, लढाया यशस्वी करत गडकोट काबीज करणे हे करत असतानाच, दुसर्‍या बाजूला शिवरायांची प्रशासनात्मक व रचनात्मक कामेही चालूच असत। शिवाजीराजांनी एक आदर्श शासनव्यवस्था उभी केली. सैन्याचा पगार केंद्रीय पद्धतीने देणे, सरदारांच्या बदल्या करणे, शेती व शेतसार्‍याबद्दल यंत्रणा लावणे, भूक्षेत्रानूसार शेतसारा निश्र्चित करणे, नैसर्गिक आपत्तींच्या काळात प्रसंगी शेतसारा माफ करणे अशा अनेक महत्त्वाच्या व्यवस्था त्या काळात सुरू झाल्या. 6 महिने स्वराज्याच्या सैन्यात नोकरी व 6 महिने शेती करणे ही शिलेदारी व्यवस्था सुरू करून महाराजांनी प्रजेला 2 वेळची भाकरी मिळवण्याची आणि देशसेवा करण्याची संधी एकत्रितपणे दिली. त्यामुळे प्रजेला आर्थिक व सामाजिक सुरक्षितता प्राप्त झाली, तसेच स्वराज्याबद्दलची प्रजेची निष्ठा अधिकाधिक घट्ट होत गेली.

सूर्याजी काकडे, वाघोजी तुपे, बाजी पासलकर, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, ... यांसारख्या हजारो मावळ्यांनी स्वत:च्या प्राणाची बाजी लावून स्वराज्याचे स्वप्न साकार केले। त्यामागे फार मोठा ध्येयवाद होता, राष्ट्रवाद होता. आधुनिक शस्त्रास्त्रे, वेगवान घोडदळाचा विकास व कोकण किनारपट्टीकडून अरब, हपशी, सिद्धी, पोर्तुगीज यांपासून संरक्षण करण्यासाठी केलेली आरमाराची स्थापना या महत्त्वाच्या घटकांचेही त्यामध्ये योगदान होते. शत्रूचे मर्म आणि मर्यादा ओळखून त्यावर अचानकपणे हल्ला करून, वार्‍याच्या वेगाने चाल करून शत्रूची दाणादाण उडवून देण्याच्या अनोख्या तंत्रामुळे त्यांनी दिलेरखान, शाहिस्तेखान, अफझलखान व इतर अनेक सरदारांची पळताभुई थोडी केली .स्वराज्यावर चालून आलेल्या प्रत्येक आक्रमणापासून त्यांनी प्रजेचे रक्षण केले.

जगद्‌गुरू संत तुकाराम, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज ही तीन अलौकिक व्यक्तिमत्त्वे एकाच काळात महाराष्ट्रात वास्तव्यास होती। महाराष्ट्राचा तो सुवर्णकाळच! संत तुकाराम व छत्रपती शिवराय यांच्या भेटीचे उल्लेख इतिहासात आढळतात. (काही अभ्यासक या दोहोंची भेट 1647 साली झाल्याचे सांगतात, तर काही अभ्यासक 1649 मध्ये ही भेट झाल्याचा अंदाज व्यक्त करतात.) संत तुकारामांचे कीर्तन ऐकून मूळातच सत्‌प्रवृत्तीचे व आध्यात्मिक वृत्तीचे असणारे छत्रपती यांच्या मनात विरक्तीचे विचार प्रबळ झाले. पण संत तुकोबारायांनी छत्रपतींना `आम्ही जगाला उपदेश करावा। आपण क्षात्रधर्म सांभाळावा' असा उपदेश केला. शिवरायांनी या आज्ञेचे पुढील काळात तंतोतंत पालन केले.

स्वराज्य खूप मोठे झाले होते। अशा वेळेसच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्र धर्माच्या पुनरुत्थानाचे बीजच ठरले. 1674 सालच्या ज्येष्ठ महिन्यामध्ये त्यांचा राज्याभिषेक काशीच्या गागाभट्टांकडून झाला. महाराज छत्रपती झाले. हा महाराष्ट्राच्या व भारताच्याही इतिहासातील एक सर्वोच्च पराक्रमाचा, आनंदाचा व अभिमानाचा क्षण होय!

छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी समोर येतात। शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा... असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेले दिसतात.

छत्रपती शिवाजी

- बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वत: कष्ट घेतले,

- बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वत: कष्ट घेतले, - पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला, - साध्या -भोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला, - स्वत: शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वत:ला घट्टपणे बांधून घेतले;- महत्त्वाचे गड-किल्ले जिंकले, नवे निर्माण केले, - योग्य त्या वेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्या वेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामोहरम केलेच, तसेच फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत कलहाचाही सामना केला, - आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला;- सामान्य रयतेची व्यवस्था, शेतकर्‍यांची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था... अशा अनेक व्यवस्था लावून दिल्या. - सर्वांत महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली; - राजभाषा (मराठी) विकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न केला; विविध कलांना राजाश्रय दिला. - तसेच खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला. या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या 50 वर्षांच्या आयुष्यात! सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते. महाराष्ट्र धर्म वाढवण्याची स्फूर्ती देते. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करून आले. याच काळात त्यांच्या तब्बेतीवरही फार परिणाम झाला. सततच्या मोहिमा, दगदग यामुळेच त्यांना ज्वराचा त्रास वाढतच गेला. यातच दि. 03 एप्रिल, 1680 रोजी त्यांचा मृत्यू झाला. एका विशाल पर्वाचा अंत झाला. मानवी देहाच्या मर्यादेत राहून शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती आणि इच्छाशक्ती यांच्या क्षमतेच्या योग्य वापराची अंतिम मर्यादा गाठून शौर्य, शील, नीतीमत्ता, दूरदृष्टी, धाडस, प्रसंगावधान यासारख्या अनेक सद्गुणांचा सर्वकालीन श्रेष्ठ आदर्श निर्माण करणारे शिवराय हे मनुष्याच्या अंगभूत शक्ती जाग्या होऊन योग्य कार्यात वापरल्या गेल्या तर काय चमत्कार घडतो याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. अलौकिक यश कसे मिळवावे हे शिकविणारा हा महाराष्ट्राचा देव महाराष्टीय लोकांच्या मनात अढळ आणि अमर झाला आहे. शिवचरित्र हे महाराजांच्या मृत्यूपर्यंत थांबत नाही. पुढच्या काळात तब्बल 30 वर्षे या महाराष्ट्राला स्थिर व एकमेव असे नेतृत्व नसतानाही, स्वत: औरंगजेब महाराष्ट्रात आला असतानाही हे स्वराज्य समर्थपणे त्याच्याशी लढले व मुघल सम्राटाला इथेच, याच भूमीत प्राण ठेवावे लागले. शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी समृद्ध, संपन्न असे ‘आंनदवनभुवन’ च निर्माण केले होते. त्या आनंदवनभुवनाचे वर्णन समर्थ रामदासांनी पुढील शब्दात केले आहे. हे काव्य म्हणजेच छत्रपतींनी पार पाडलेले ‘इतिकर्तव्य’ होय.

स्वर्गीची लोटली जेथे, रामगंगा महानदी, तीर्थासी तुळणा नाही।आनंदवनभुवनी।।

त्रैलोक्य चालील्या फौजा, सौख्य बंध विमोचने, मोहीम मांडिली मोठी।आनंदवनभुवनी।।

येथून वाढला धर्मु रमाधर्म समागमे , संतोष मांडला मोठा।आनंदवनभुवनी।।

भक्तांसी रक्षिले मागे आताही रक्षिते पहा, भक्तासी दिधले सर्वे।आनंदवनभुवनी।।

येथूनी वाचती सर्वे ते ते सर्वत्र देखती, सामर्थ्य काय बोलावे।आनंदवनभुवनी ।।

उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, जप-तप अनुष्ठानेआनंदवनभुवनी।।

बुडाली सर्वही पापे, हिंदुस्थान बळावले, अभक्तांचा क्षयो झाला।

आनंदवनभुवनी।।आनंदवनभुवनी।।आनंदवनभुवनी।।आनंदवनभुवनी।।

सौजन्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना संकेतस्थल

http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=1&id=90

शिवरायांचा पाळणा:-

गुणी बाळ असा जागसि का रे वांया नीज रे नीज शिवराया अपरात्री प्रहर लोटला बाई तरि डोळा लागत नाही

हा चालतसे चाळा एकच असला तिळ उसंत नाही जिवाला निजयावयाचा हरला सर्व उपाय जागाच तरी शिवराय

चालेल जागता चटकाहा
असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका

का कष्टविसी तुझी सांवळी काया नीज रे नीज शिवराया १ ही शांत निजे बारा मावळ थेट शिवनेरी जुन्नर पेठ त्या निजल्या ना तशाच घाटाखाली कोकणच्या चवदा ताली ये भिववाया बागुल तो बघ बाळा किति बाई काळा काळा

इकडे हे सिद्दीजवान
तो तिकडे अफझुलखान
पलिकडे मुलूख मैदान
हे आले रे तुला बाळ धराया नीज रे नीज शिवराया २

प्रभो शिवाजीराजा

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा - स्वातंत्र्यवीर सावरकर