Saturday, 5 March 2011

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी अंतर्गत कलहाशी व
शत्रूशी समर्थपणे व प्राणपणाने लढणारे धर्मवीर!

मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला। शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला।।

वरील दोन ओळींतच खर्‍या अर्थाने संभाजी महाराज यांच्या चरित्राने स्वराज्याला दिलेला महान असा स्वराष्ट्रवाद, स्वधर्माभिमान व्यक्त होतो.

संभाजीराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांच्या पोटी जेष्ठ शु. १२, शके १५७९ रोजी पुरंदर गडावर झाला. ते केवळ २ वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्रींना देवाज्ञा झाली. अशा प्रकारे लहानपणापासून त्यांच्यावर काळाच्या आघाताला सुरूवात झाली. सईबाईंच्या पश्र्चात राजमाता जिजाबाई शंभूराजांच्या पालनपोषणाची सर्व व्यवस्था पाहू लागल्या. केशव भट आणि उमाजी पंडित हे शंभूराजांचे गुरू होते. संभाजीराजांना कोणकोणते शिक्षण दिले गेले हे सभासद व चिटणीसांच्या बखरीतून मोठ्या प्रमाणावर स्पष्ट होते.

‘‘संभाजीराजांनी विद्याभ्यास करावा, त्याला सुशिक्षित करावे म्हणून त्याला घोड्यावर बसविणे, शास्त्रविद्या, तालीम यांचे शिक्षण देवविले. अष्टप्रधान यात राजपुत्राची गणना आहे. सर्व आमात्य राजाचा वामभुज; युवराज, राजपुत्र हा सत्यभुज असे आहे. त्याअर्थी तो सुशिक्षित असावा म्हणून लेखनादि अभ्यास करविला. दंडनिती, राजधर्म हे सांगविले. राजपुत्र धर्म, पितृसेवा कायावाचामने करावी. पित्याने संतुष्ट होऊन युवराजपद कारभार सांगितला असा गर्वारुढ उत्पन्न होऊ नये. राजाचे कुळी अनीतिमान पुत्र निर्माण झाला म्हणजे ते राज्य व कुल शीघ्र क्षयास जाते. म्हणुन बहुत नीतिने रक्षिणे तसे रक्षिले. आणि मातबर सरकारकून प्रौढ यांच्यापाशी बसावे, दरबारात बसावे म्हणजे कारभार माहित होत जाईल.’’ अशी नोंद ऐतिहासिक कागदपत्रांत आढळते. अशा प्रकारे संभाजीराजांचे औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण झाले. याचबरोबर सैन्याचे नेतृत्व करण्याचा अनुभव त्यांना मिळावा या हेतूने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज स्वत:बरोबर एखाद्या आघाडीवर नेत असत किंवा पाच-दहा हजार सैन्याचे नेतृत्व त्यांना देत असत. संभाजीराजांची अतिशय काटेकोर पद्धतीने जडणघडण होत गेली.

याच दरम्यान त्यांच्या जडणघडणीच्या काळात त्यांना खूप मोठा अनुभव मिळाला. हा अनुभव होता छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरील आग्रा भेटीचा. या काळात महाराजांच्या सहवासात त्यांच्या अनेक पैलुंचा, गुणांचा संभाजीराजांवर नकळतपणे प्रभाव पडत गेला. वेगळ्या अशा राजकारणी धोरणांची, मुत्सद्दीपणाची त्यांना ओळख झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्भूत, अचाट साहसाचे ते साक्षीदार होते. त्यानंतरच्या काळात वेशांतर करून स्वराज्यात दाखल होईपर्यंत त्यांना प्रत्यक्ष समाज पाहता आला. हा अनुभव त्यांना पुढे राज्यकारभार चालविण्यासाठी खूप उपयोगी पडला. मिर्झाराजांकडे ओलीस राहणे, शाही फर्मान स्वीकारणे या गोष्टी देखील त्यांना दिशादर्शक ठरल्या. खूप लहान वयातच शत्रूचा सहवास त्यांना दीर्घकाळ लाभल्यामुळे त्यांची कार्यपद्धती त्यांना अनुभवता आली.

विद्याभ्यास, शस्त्रविद्या, दरबारातील कारभार, युद्धविद्या, सैन्याचे नेतृत्व या सर्व गोष्टीत संभाजी राजे पारंगत तर होतच होते. त्याबरोबरच त्यांचे संस्कृत व हिंदी या भाषांवरही प्रभुत्व होते. त्यांनी ४ काव्यग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्या बुधभूषण या संस्कृत ग्रंथात दोन अध्याय असून पहिल्या अध्यायात ‘स्वकुल’ व ‘स्वकाव्य वर्णन’ या विषयीचे लेखन आढळते तर दुसर्‍या अध्यायात ‘राजनिती’ व ‘दुर्ग निरूपण’ या विषयीची सविस्तर माहिती संभाजी महाराजांनी लिहिलेली आढळते.

शिवराज्याभिषेकानंतर त्यांनी अनेक मोहिमांवर नेतृत्व केले. पण खर्‍या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच संभाजीमहाराज लोकांना कळाले. छत्रपतींचा वारसदार हा तेवढाच कार्यकुशल व पराक्रमी आहे हे त्यांनी प्रत्येक बाबतीत सिद्ध केले.

केवळ ९ वर्षांच्या काळात त्यांनी १२८ लढाया जिंकून आपल्या पित्याच्या नावाला खूप मोठा सन्मान प्राप्त करून दिला. याच काळात कोकणात धर्माच्या नावाखाली हैदोस घालणार्‍या धर्मांध लोकांचा त्यांनी बंदोबंस्त केला. गोवा येथेही पोर्तुगिजांवर हल्ला केला. या स्वारीच्या वेळी त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता खाडीमध्येच घोडा घालून आदर्श नेतृत्त्व सिद्ध केले. धर्मांतरित लोकांना पुन्हा हिंदू धर्मात घेऊन त्यांनी शिवाजी महाराजांचे कार्य सुरू ठेवले. सततच्या स्वार्‍यांमुळे त्यांनी औरंगजेबाच्या नाकीनऊ आणले होते. त्यामुळेच तो चिडून दक्षिणेत आला होता. आक्रमक सेनानी व कुशल प्रशासक म्हणून त्यांनी राज्यकारभार फार कुशलतेने सांभाळला व उत्तमपणे शासनव्यवस्था सांभाळली. छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा पुढीलप्रमाणे होती,
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।

आपल्या कारकीर्दीत छत्रपती संभाजी महाराजांना अतिशय विषम अशा परिस्थितीस सातत्याने तोंड द्यावे लागले. अनुभवी औरंगजेब सुमारे सात लाख सैन्यासह स्वराज्यावर चालून आला होता, आणि तरुण, अननुभवी संभाजी राजांकडे सैन्य होते केवळ तीस ते पस्तीस हजार. शिवाय घरभेदी, फितूर लोकांच्या कारवाया होत्याच. पण या सर्व परिस्थितीतही छत्रपती संभाजी राजांनी मोगली सैन्याला दाद दिली नाही, औरंगजेबाला यश लाभले नाही. पण फितुरांमुळे संभाजीराजे शत्रुच्या ताब्यात सापडले. १६८९ मध्ये संभाजी राजे विशाळगडाकडून रायगडाकडे जाताना संगमेश्र्वर येथे मुक्कामी थांबले होते. फितुरांकडून बातमी मिळाल्यानंतर मुखर्रबखान या मोगली सरदाराने त्यांना ताब्यात घेतले. औरंगाजेबाने त्यांना तुळापूर येथे आणले. तेथे त्यांच्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव आणण्यात आला. त्यांच्या देहाचे हाल करण्यात आले. औरंगजेबाने या प्रसंगी क्रौर्याची परिसीमा गाठली. पण छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मपरिवर्तनास होकार दिला नाही. धर्मासाठी, मुख्य म्हणजे स्वराज्यासाठी त्यांनी स्वत:चे बलिदान दिले. पुणे जिल्ह्यातील वढू (बु.) येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. त्यांच्या समाधीचे दर्शन घेताना कोण्या एका कवीने सहजपणे उद्गार काढले आहेत,

कविराजकुशल, राजकार्यधुरंधर हा सिंहाचा छावा,
पिढ्यापिढ्यांना देत प्रेरणा घेई येथे विसावा.





छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील ग्रंथांची सूची :
१. छावा - शिवाजी सावंत - कॉन्टिनेन्टल प्रकाशन
२. संभाजी - विश्र्वास पाटील - मेहता पब्लिशिंग हाउस
३. शिवपुत्र संभाजी - डॉ. कमल गोखले - कॉन्टिनेन्टल प्रकाशन
४. छत्रपती संभाजी - वा. सी. बेंद्रे
५. मराठ्यांची धारातीर्थे - प्रवीण व. भोसले - नरसिंह पब्लिकेशन्स
६. शंभूराजे - प्रा. सु. ग. शेवडे - धर्मसेवा प्रकाशन
७. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज - अरुण जाखडे - पद्मगंधा प्रकाशन

http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=4&id=751

Friday, 13 March 2009

जिजाबाई भोसले

जिजाबाई (१५९४-१६७४) ही सिंदखेडच्या लखुजी जाधवांची कन्या। जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. इ.स. १६०५ मध्ये जिजाबाई आणि शहाजीराजांचा विवाह झाला.

पुढे लखुजी जाधव व शहाजी राजे यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला असता, जिजाबाई आपल्या पतीशी कायम एकनिष्ठ राहिल्या। नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता.

जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती। त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.

राजांचे संगोपन आणि कुशल कारभार
शिवाजीराजे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली। अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. दादोजी कोंडदेव व इतर कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले.

निजामशाही, अदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती। अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेवांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. त्यांच्यावर संस्कार घडवले.

आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत. राजांना घडवताना त्यांनी फक्त रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.

राजांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नात जिजाबाईंच्या प्रेरणेचा खूप मोठा हातभार होता।

जीवन

शहाजी राजांनी बंगळूरात तुकाबाईंशी दुसरे लग्न केल्यावर जिजाबाईंच्या वाटयाला फारसे पती प्रेम व राजांच्या वाटयाला पिताप्रेम आले नाही। परंतु आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.


राजांच्या प्रथम पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते। त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठींबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज सोयरिक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.

राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत। त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहावत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.

शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेका नंतर थोडयाच दिवसांत, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले

शहाजीराजे भोसले

पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व!

जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मिळून निजामशाही संपवली, त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला, व जणू स्वत:वरच छत्र धारण केले। ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ 3 वर्षे टिकला होता. या प्रसंगातून छत्रपती शिवाजी महाराजांची तल्लख बुद्धी, पराक्रम, रयतेचे पालनपोषण करण्याची जबाबदारीची भावना, चारित्र्य याप्रमाणेच स्वराज्यसंकल्पना हे सर्व घटक आनुवंशिकतेने शहाजीराजांकडून त्यांच्या अंगी आले होते असे निश्र्चितपणे म्हणता येते.

फार वर्षांपूर्वी राजस्थानच्या चितोडगडच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला। पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसल्यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा 1603 साली विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.

दरम्यान अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतवर्षातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या। निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते (इ. स. 1624). त्यांना त्यात यश मिळाले. शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. पण पुढे मलिक अंबरची दरबारातील राजकारणी वागणूक पाहून शहाजीराजे आदिलशाहीत गेले. त्यानंतर 1639 साली आदिलशहाकडून सरलष्कर ही पदवी त्यांना देण्यात आली व बंगळूरची जहागिरीही त्यांना प्राप्त झाली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता.

शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला। शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. ते मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणूनच त्यांनी योग्य वेळ पाहून पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवले होते. त्याचबरोबर श्यामराज रांझेकर, बाळकृष्णपंत हणमंते, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांना जय्यत तयारीनिशी शिवाजी महाराजांसोबत राज्यकारभारासाठी पाठवले होते. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली.

दरम्यानच्या काळात आदिलशहाचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, मंबाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले। साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता 25 जुलै, 1648 चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वत: आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि. 16 मे, 1649 रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.

शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही, मुघलशाही व निजामशाही - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले। त्यांच्या कारकीर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे,
इ। स. 1625 ते 1628 - आदिलशाही इ. स. 1628 ते 1629 - निजामशाही इ. स. 1630 ते 1633 - मुघलशाही इ.स. 1633 ते 1636 - निजामशाही इ.स. 1636 पासून पुढे - आदिलशाही

पुढे 1661-62 दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते। त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध 5, म्हणजेच 23 जानेवारी,1664 रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

एक शूर मराठा सरदार. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीराजाचे पिता व राजमाता जिजाबाई यांचे यजमान।

शिवाजी महाराजांची थोरवी

वस्तुनिष्ठ भूमिकेवरून विचार केला तरच शिवाजीमहाराजांच्या थोरवीचे आकलन होईल। त्यांनी स्वराज्यसंस्थापना केली याचा अर्थ त्यांनी मुसलमानांचे वर्चस्व नाहीसे केले. युरोपीय व्यापार्‍यांच्या वखारी लुटल्या आणि जाळल्या याचा अर्थ त्यांच्या आक्रमक वृत्तीला पायबंद घातला. ते लोकोत्तर पुरूष होते याविषयी वाद असण्याचे कारण नाही. जगातील कोणत्याही विभूतीच्या अंगी आढळणारे अनेक असाधारण गुण त्यांच्या ठायी एकत्रित झाले होते. लहानपणापासून नाना प्रकारची संकटे सोसल्यामुळे त्यांना जगाचा विशेष अनुभव होता आणि त्याचा योग्य उपयोग करून घेण्याची बुद्धी स्वभावात:च त्यांच्या ठिकाणी होती. त्यांची राहणी साधी होती. त्यामुळे शिपाईगड्यांत त्यांच्यासंबंधी आपुलकी होती. त्या बळावर त्यांनी आपल्याभोवती जीवास जीव देणारे असंख्य मित्र गोळा केले होते.

महाराज नीतिमान होते। त्यांना कोणतेही व्यसन नव्हते. शत्रूच्या स्त्रियांना त्यांनी सुखरूपपणे त्यांच्या घरी पोहोचविल्याचे प्रसंग त्यांच्या चरित्रात आहेत. आपल्या आचरणाने त्यांनी प्रजेला नीतीचा धडा शिकविला होता. त्यांच्या राजनीतीत शक्ती व युक्ती या दोहींचा समन्वय होता. ते जसे शूर योद्धे होते तसे बुद्धिमान मुत्सद्दी होते. ध्येय आणि व्यवहार यांची सांगड घालण्याचे कौशल्य त्यांना साधले होते.

त्यांची धर्मावर नि:सीम श्रद्धा होती। धर्मभावना त्यांच्या अंत:करणात सदैव जागृत होती. राष्ट्रोन्नती धर्मोन्नतीवर अवलंबून आहे अशी त्यांची दृढ धारणा होती. तिच्या अनुषंगाने त्यांची सारी कार्ये होत. राज्यव्यवहाराबाबत त्यांचा स्वभाव अत्यंत कडक होता. गुन्हेगाराला ते जबरदस्त शिक्षा दिल्याशिवाय राहात नसत. प्रतापराव गुजरांवरचा त्यांचा राग इतिहासात नमूद आहे. कारभारात महाराज कडक असले तरी मुळात ते अंत:करणाने कोमल व दयाशील होते.

त्यांनी पैसा गोळा केला। कारण सैन्य ठेवण्यास पैसा उभारावा लागतो. आणि सैन्याशिवाय शत्रूला तोंड देता येत नाही. त्यांनी थोड्या पैशांत व थोड्या खर्चात फौजफाटा व गड, किल्ले यांची अत्यंत उत्तम व्यवस्था ठेवली. अडाणी मावळ्यांना त्यांनी हाताशी धरले व स्वराज्यस्थापनेचे कार्य केले. यात त्यांची योजकता व्यक्त होते. त्यांच्या पश्चात हे कार्य कुणास साधले नाही. कारण मराठ्यांशी जशी परंपरा ऐकू येते तशी मावळ्यांची परंपरा ऐकू येत नाही. या वस्तुस्थितीचा कदाचित आनुवंशिकतेशी संबंध असावा.

राज्यकारभारात महाराज सदैव सावध होते। त्यांचे हेरांचे खाते होते. त्यांच्या हेरांत बहिर्जी नाईक प्रसिद्ध आहे. कारभार चालविण्यासाठी त्यांनी अष्टप्रधान नेमले होते. त्यांच्यात कामाची वाटणी करण्यात आली होती, त्यांची शिस्त अत्यंत कडक होती. त्यांनी जिंकलेल्या मुलुखावर चौथाई म्हणून एक नवीन हक्क बसविला. त्या चौथाईच्या उत्पन्नावर जिंकलेल्या प्रदेशाच्या संरक्षणाचा आणि फौजेच्या इतर खर्चाचा भार असे. तिच्यावरून इंग्रजांना तैनाती फौजेची कल्पना स्फुरली होती. महाराजांची फौज किती शिस्तबद्ध होती याची साक्ष त्यांचे हे पत्र देईल.

पावसाळ्याच्या तोंडी त्यांनी सैन्याला ताकीद दिली आहे, ''पावसाळ्याकारणे पागेस सामा व दाणा व वरकड केला होता तो कित्येक खर्च होऊन गेला। परंतु जरूर जाले त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसीतैसी पागेची बेगमी केली आहे। असेल तोवरी धुंदी करून चाराल. मग पडत्या पावसात काही मिळणार नाही. उपास पडतील. घोडी मरावयास लागतील. म्हणजे विलातीस तसवीस देऊ लागाल. तरी रयतेस काडीचा आधार द्यावयाची गरज नाही. घलक पागेचे आहेत, खण धरून राहिले असतील, कोणी आगट्या करतील, कोणी भलतेच जागा चुली रंधनाला करतील, कोणी तंबाकूला आगी घेतील. गवत पडले आहे ऐसे अगर वारे लागले आहे ऐसे मनामन आणिता म्हणजे अविस्त्राच एखादा दगा होईल. रात्रीस दिवा घरात असेल, अविस्त्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. बदनामी ज्यावर येईल त्यास, मराठियाची तो इज्जत वाचणार नाही.

- भवानीशंकर पंडित
(महाराष्ट्राच्या जीवनातील स्थित्यंतरे पुस्तकातून साभार)

Monday, 2 March 2009

।।शिवकल्याण राजा।।

निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।

नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।

यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।

आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।

धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।सावधपणे नृपवर तुच्छ केले।।

देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।

हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलीया भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।

महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।कित्येक दृष्ट संहारली।

कित्येकासी धाक सुटला ।कित्येकाला आश्रयो जाहला

।शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।

शिवकाळात स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे समर्थ रामदास यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे महानतम व युगप्रवर्तक असे व्यक्तिमत्त्व उपरोक्त परिपूर्ण, आशयघन व वजनदार अशा शब्दांत तोलले आहे। छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाच्या व कार्यकर्तृत्वाच्या प्रत्येक पैलुचा उल्लेख या कवनात केलेला आहे.

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं, त्या काळी 5 पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी। सुमारे 300 वर्षे महाराष्ट्र पारतंत्र्यात, गुलामगिरीत खितपत पडला होता. दिल्लीचे मुघल, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह यांच्या अत्याचाराने इथली गरीब जनता भरडली जात होती. साम्राज्यवादाने झपाटलेल्या सुलतानी आक्रमणांमुळे इथली घरे-दारे, पीक-पाणी, बायका-पोरी सुरक्षित नव्हत्या. याच काळात शहाजीराजे भोसले व जिजामाता यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी, 1630 रोजी, (संदर्भ : श्री राजा शिवछत्रपती, गजानन मेहेंदळे, डायमंड पब्लिकेशन्स) पुणे जिल्ह्यातील, जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला. वडिलांचा जाहगिरीचा प्रदेश बंगळूरचा (कर्नाटक) असल्यामुळे शिवबांची जडण-घडण त्यांच्या आई जिजाबाईंच्या सहवासात व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाली. रामायण, महाभारत या गोष्टींचे शिवबांवर लहानपणापासून संस्कार झाले. या गोष्टींच्याच माध्यमातून त्यांची स्वराज्य प्रेरणा जिजाबाईंनी जागृत केली. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र यांचा अभ्यास त्यांनी लहानपणीपासून मोठ्या कुशलतेने केला. त्याचबरोबर लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी याबाबतीतही शिवबा पारंगत झाले.

मुरार जगदेवाने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवल्यानंतर त्या जाहगिरीचा ताबा जिजाबाईंनी घेतला। जिजाबाईंनी त्याच ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवून, लोकांना एकत्र करून पुन्हा पुणे हे गाव वसवलं. याच काळात जाहगिरीच्या कारभाराच्या निमित्ताने शिवाजी राजांचा संबंध इथल्या 12 मावळांमध्ये आला. या ठिकाणीच त्यांना प्रथम बालमित्र व नंतर स्वराज्याचे शिलेदार मिळाले. या काळातच त्यांचे नेतृत्वगुणही फुलायला लागले. एका स्त्रीवर अत्याचार करणार्‍या एका गावाच्या पाटलाला त्यांनी हात-पाय तोडण्याची शिक्षा याच काळात सुनावली. आपल्या दक्ष न्यायव्यवस्थेचे उदाहरण रयतेसमोर ठेवले व स्वराज्याच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारण्यास ते समर्थ असल्याचेही सिद्ध केले. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी रायरेश्र्वराच्या पठारावर शिवलिंगाला स्वत:च्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली. या वेळी सोबत त्यांचे जिवाभावाचे सवंगडी-मावळे होतेच. तोरणा जिंकून त्यांनी जणू स्वराज्य स्थापनेचे तोरणच बांधले. तोरण्यानंतर पुरंदर काबीज करणे, फत्तेखानाबरोबरची लढाई यामुळे शिवरायांचा आत्मविश्र्वास व निर्धार या दोन्ही गोष्टी वाढत गेल्या. पण त्यांची खरी परीक्षा झाली ती शहाजीराजांना कैद झाली त्या वेळी! शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या सूत्राचा उपयोग करून, दिल्लीच्या बादशाहकरवी आदिलशाहवर दबाव आणून त्यांनी आपल्या मुत्सद्दी राजकारणाचे दर्शन घडवले.

त्यानंतरच्या काळात अफझलखानाच्या रूपाने महाराष्ट्रावर खूप मोठे संकट आले। हजारो गावे खानाच्या सैन्याने जाळली, हजारो मंदिरं नष्ट केली आणि रयतेवरही खूप अन्याय केले. पण महाराजांनी न घाबरता, न डगमगता त्याचा सामना करण्याचे ठरवले. स्वराज्याचे आपण पालक आहोत ही भावना प्रबळ होत गेली. त्यातच कान्होजी जेधे व इतर अनेक सरदारांनी केलेला त्याग व पराक्रम यातून कृतज्ञतेची आणि जबाबदारीची भावना प्रबळ होत गेली. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून इतिहासात नवा अध्याय लिहिला. ‘अफझलखान चाल करून आला, त्याला महाराजांनी शिताफीने प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीला बोलावले आणि धाडसाने खानाला संपवले.’ - या वाक्यांमध्ये महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा, अभ्यासकांना आश्र्चर्य वाटेल असा आणि आजही मार्गदर्शक ठरेल असा मोठा इतिहास सामावलेला आहे. खानाला भेटतानाचा गणवेश, खानाचा देह (उंची, जाडी), स्वत:ची उंची, `काय झाल्यास काय करायचे' याच्या पर्यायांचा अभ्यास, सोबतीच्या माणसांची निवड, खानाचा खात्मा केल्यानंतर त्याच्या सैन्याचा पराभव करण्यासाठीचे नियोजन, त्यासाठीचा गनिमी कावा, मोहीम अयशस्वी झाली अन्‌ खुद्द शिवरायांना दगाफटका झाला तर पुढे काय करायचे याचे पूर्ण नियोजन - या सर्व घटकांचा तपशीलवार विचार महाराजांनी त्या प्रसंगी करून ठेवला होता. शाहिस्तेखानाची पुण्यात लाल महालात कापलेली बोटे, पुढील काळात आग्र्याहून केलेली सुटका हे सुप्रसिद्ध ऐतिहासिक प्रसंगही छत्रपती शिवरायांच्या गुणांची साक्ष देतात.

स्वराज्याची सीमा दक्षिणेत तुंगभद्रेपर्यंत तर उत्तरेत सातपुड्यापर्यंत त्यांनी नेली होती। लढाईच्या काळात त्यांनी कधी रयतेला त्रास दिला नाही, की मराठी सैन्याने कुणाच्या स्त्रियांवर अत्याचार केला नाही. स्वत:च्या सैन्यासमोर त्यांनी आदर्श ध्येयवाद, नीतिमूल्ये व स्वराज्यनिष्ठा ठेवल्यामुळे मराठी सैन्यामध्ये सदैव आवेग, आवेश आणि उत्साहाचे वातावरण असायचे!

स्वराज्यनिष्ठा व पराक्रम यांसह सैन्य उभे करणे, विविध आक्रमणांना तोंड देणे, लढाया यशस्वी करत गडकोट काबीज करणे हे करत असतानाच, दुसर्‍या बाजूला शिवरायांची प्रशासनात्मक व रचनात्मक कामेही चालूच असत। शिवाजीराजांनी एक आदर्श शासनव्यवस्था उभी केली. सैन्याचा पगार केंद्रीय पद्धतीने देणे, सरदारांच्या बदल्या करणे, शेती व शेतसार्‍याबद्दल यंत्रणा लावणे, भूक्षेत्रानूसार शेतसारा निश्र्चित करणे, नैसर्गिक आपत्तींच्या काळात प्रसंगी शेतसारा माफ करणे अशा अनेक महत्त्वाच्या व्यवस्था त्या काळात सुरू झाल्या. 6 महिने स्वराज्याच्या सैन्यात नोकरी व 6 महिने शेती करणे ही शिलेदारी व्यवस्था सुरू करून महाराजांनी प्रजेला 2 वेळची भाकरी मिळवण्याची आणि देशसेवा करण्याची संधी एकत्रितपणे दिली. त्यामुळे प्रजेला आर्थिक व सामाजिक सुरक्षितता प्राप्त झाली, तसेच स्वराज्याबद्दलची प्रजेची निष्ठा अधिकाधिक घट्ट होत गेली.

सूर्याजी काकडे, वाघोजी तुपे, बाजी पासलकर, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, ... यांसारख्या हजारो मावळ्यांनी स्वत:च्या प्राणाची बाजी लावून स्वराज्याचे स्वप्न साकार केले। त्यामागे फार मोठा ध्येयवाद होता, राष्ट्रवाद होता. आधुनिक शस्त्रास्त्रे, वेगवान घोडदळाचा विकास व कोकण किनारपट्टीकडून अरब, हपशी, सिद्धी, पोर्तुगीज यांपासून संरक्षण करण्यासाठी केलेली आरमाराची स्थापना या महत्त्वाच्या घटकांचेही त्यामध्ये योगदान होते. शत्रूचे मर्म आणि मर्यादा ओळखून त्यावर अचानकपणे हल्ला करून, वार्‍याच्या वेगाने चाल करून शत्रूची दाणादाण उडवून देण्याच्या अनोख्या तंत्रामुळे त्यांनी दिलेरखान, शाहिस्तेखान, अफझलखान व इतर अनेक सरदारांची पळताभुई थोडी केली .स्वराज्यावर चालून आलेल्या प्रत्येक आक्रमणापासून त्यांनी प्रजेचे रक्षण केले.

जगद्‌गुरू संत तुकाराम, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज ही तीन अलौकिक व्यक्तिमत्त्वे एकाच काळात महाराष्ट्रात वास्तव्यास होती। महाराष्ट्राचा तो सुवर्णकाळच! संत तुकाराम व छत्रपती शिवराय यांच्या भेटीचे उल्लेख इतिहासात आढळतात. (काही अभ्यासक या दोहोंची भेट 1647 साली झाल्याचे सांगतात, तर काही अभ्यासक 1649 मध्ये ही भेट झाल्याचा अंदाज व्यक्त करतात.) संत तुकारामांचे कीर्तन ऐकून मूळातच सत्‌प्रवृत्तीचे व आध्यात्मिक वृत्तीचे असणारे छत्रपती यांच्या मनात विरक्तीचे विचार प्रबळ झाले. पण संत तुकोबारायांनी छत्रपतींना `आम्ही जगाला उपदेश करावा। आपण क्षात्रधर्म सांभाळावा' असा उपदेश केला. शिवरायांनी या आज्ञेचे पुढील काळात तंतोतंत पालन केले.

स्वराज्य खूप मोठे झाले होते। अशा वेळेसच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्र धर्माच्या पुनरुत्थानाचे बीजच ठरले. 1674 सालच्या ज्येष्ठ महिन्यामध्ये त्यांचा राज्याभिषेक काशीच्या गागाभट्टांकडून झाला. महाराज छत्रपती झाले. हा महाराष्ट्राच्या व भारताच्याही इतिहासातील एक सर्वोच्च पराक्रमाचा, आनंदाचा व अभिमानाचा क्षण होय!

छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी समोर येतात। शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा... असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेले दिसतात.

छत्रपती शिवाजी

- बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वत: कष्ट घेतले,

- बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वत: कष्ट घेतले, - पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला, - साध्या -भोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला, - स्वत: शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वत:ला घट्टपणे बांधून घेतले;- महत्त्वाचे गड-किल्ले जिंकले, नवे निर्माण केले, - योग्य त्या वेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्या वेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामोहरम केलेच, तसेच फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत कलहाचाही सामना केला, - आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला;- सामान्य रयतेची व्यवस्था, शेतकर्‍यांची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था... अशा अनेक व्यवस्था लावून दिल्या. - सर्वांत महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली; - राजभाषा (मराठी) विकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न केला; विविध कलांना राजाश्रय दिला. - तसेच खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला. या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या 50 वर्षांच्या आयुष्यात! सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते. महाराष्ट्र धर्म वाढवण्याची स्फूर्ती देते. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करून आले. याच काळात त्यांच्या तब्बेतीवरही फार परिणाम झाला. सततच्या मोहिमा, दगदग यामुळेच त्यांना ज्वराचा त्रास वाढतच गेला. यातच दि. 03 एप्रिल, 1680 रोजी त्यांचा मृत्यू झाला. एका विशाल पर्वाचा अंत झाला. मानवी देहाच्या मर्यादेत राहून शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती आणि इच्छाशक्ती यांच्या क्षमतेच्या योग्य वापराची अंतिम मर्यादा गाठून शौर्य, शील, नीतीमत्ता, दूरदृष्टी, धाडस, प्रसंगावधान यासारख्या अनेक सद्गुणांचा सर्वकालीन श्रेष्ठ आदर्श निर्माण करणारे शिवराय हे मनुष्याच्या अंगभूत शक्ती जाग्या होऊन योग्य कार्यात वापरल्या गेल्या तर काय चमत्कार घडतो याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. अलौकिक यश कसे मिळवावे हे शिकविणारा हा महाराष्ट्राचा देव महाराष्टीय लोकांच्या मनात अढळ आणि अमर झाला आहे. शिवचरित्र हे महाराजांच्या मृत्यूपर्यंत थांबत नाही. पुढच्या काळात तब्बल 30 वर्षे या महाराष्ट्राला स्थिर व एकमेव असे नेतृत्व नसतानाही, स्वत: औरंगजेब महाराष्ट्रात आला असतानाही हे स्वराज्य समर्थपणे त्याच्याशी लढले व मुघल सम्राटाला इथेच, याच भूमीत प्राण ठेवावे लागले. शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी समृद्ध, संपन्न असे ‘आंनदवनभुवन’ च निर्माण केले होते. त्या आनंदवनभुवनाचे वर्णन समर्थ रामदासांनी पुढील शब्दात केले आहे. हे काव्य म्हणजेच छत्रपतींनी पार पाडलेले ‘इतिकर्तव्य’ होय.

स्वर्गीची लोटली जेथे, रामगंगा महानदी, तीर्थासी तुळणा नाही।आनंदवनभुवनी।।

त्रैलोक्य चालील्या फौजा, सौख्य बंध विमोचने, मोहीम मांडिली मोठी।आनंदवनभुवनी।।

येथून वाढला धर्मु रमाधर्म समागमे , संतोष मांडला मोठा।आनंदवनभुवनी।।

भक्तांसी रक्षिले मागे आताही रक्षिते पहा, भक्तासी दिधले सर्वे।आनंदवनभुवनी।।

येथूनी वाचती सर्वे ते ते सर्वत्र देखती, सामर्थ्य काय बोलावे।आनंदवनभुवनी ।।

उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, जप-तप अनुष्ठानेआनंदवनभुवनी।।

बुडाली सर्वही पापे, हिंदुस्थान बळावले, अभक्तांचा क्षयो झाला।

आनंदवनभुवनी।।आनंदवनभुवनी।।आनंदवनभुवनी।।आनंदवनभुवनी।।

सौजन्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना संकेतस्थल

http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=1&id=90

Friday, 20 February 2009

सिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी

राखी हिन्दुवानी, हिन्दुवानको तिलक राख्यो
अस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं

राखी रजपुती , रजधानी राखी राजन की
धरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं

भूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की
देस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं

साही के सपूत , सिवराज समशेर तेरी
दिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं

वेद राखे विदित , पुराण राखे सारयुत
रामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं

हिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की
कान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं

मिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह
बैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं

राजन की हद्द राखी , तेगबल सिवराज
देव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं

देवल गिराविते , फिराविते निसान अली
ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी

गौर गणपती आप , औरनको देत ताप
आपनी ही बार सब , मारी गये दबकी

पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत
सिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की

कासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती
सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी

- कविराज भूषण।

याचा अर्थ असा की हे! शहाजींचे वीर पुत्र शिवाजी महाराज! तुम्ही आपल्या तलावारीने हिंदुत्वाचे संरक्षण केले।हिन्दुंचा तिलक राखला आहे. श्रुति, स्मृति व पुराणातील आचारधर्माचे संरक्षण केले. राजपुतांचा क्षात्र धर्म व राजांच्या राजधान्यांना आपनाच स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. पृथ्वीवर धर्म आपणच राखला आहे. गुणिजनांमधील श्रेष्ठ गुणांचे अस्तित्व आपल्यामुळेच राहिले आहे. आपण महाराष्ट्राची महानता वाढवली आहे व महाराष्ट्राला श्रेष्ठता प्राप्त करून दिली आहे. आपली किर्ती दिगंतात पसरलेली आहे. आपल्या दिव्या तलवारीने दिल्लीपतीच्या सेनेचा पराभव करून, जगात हिंदुंच्या मान मर्यादांचे संरक्षण केले आहे. वेदांचे आणि पुराणांचे सामर्थ्य आपल्यामुळेच टिकून राहिले आहे. आपल्यामुळेच भाविकांच्या जिभेवर रामनाम अस्तित्व शिल्लक आहे. हिंदुंच्या पवित्र शिखेला व सैनिकांच्या भाकरीला आपल्यामुळेच संरक्षण मिळाले आहे. यज्ञोपवितांना व पवित्र जपमाळांना आपण वाचाविले आहे. मोगलांच्या सामंतांचाच नव्हे, तर बादशाहचाही आपण धुव्वा उडविलात. निग्रहानुग्रहाचे सामर्थ्य आपण प्रकट केले आहे. देवळातील देव व घरामधील धर्म केवळ आपल्यामुळेच शिल्लक राहिला आहे. सभोवाताली सर्व यवनांचे कार्य अक्षुण्णपणे चालू असता व यवन सैनिकांनी मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला असता, राजे महाराजे भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते. थोडेसे पुजविधन चुकले तर भक्तांनाच ताप देणाय्रा देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून ते लपून बसले होते. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर काशी कलाहीन झाली असती,मथुरेला मशीद उभा राहीली असती अणि हिन्दुंची सुन्ता झाली असती}

सौजन्य अनामिका

शिव कविता

इंद्र जिमि जृंभपर !
बाडव सुअंभपर !
रावण सदंभपर !
रघुकुल राज है !!

पौन वारिवाह पर !
संभु रतिनाह पर !
ज्यो सहसवाह पर !
राम द्विज राज है !

दावा दृमदंड पर !
चिता मृगझुंड पर !
भूषण वितुंड पर !
जैसे मृगराज है !!

तेज तमंअंस पर !
कन्न्ह जिमि कंस पर !
त्यों म्लेंच्छ बंस पर !
शेर शिवराज है !!

शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!

--कवीराज भूषण.

Thursday, 19 February 2009

गनिमी कावा म्हणजे काय?

शिवाजी महाराजंनी प्रवर्तित केलेल्या युद्धतंत्रासे स्वरूप विशद करण्यापूर्वी 'गनिमी कावा' या शब्दप्रयोगाच्या मुळाशी असलेल्या संकल्पना, अर्थ आणि अनर्थ इत्यादी सर्वच तपासनू घेणे आवश्यक आहे। 'गनीम' हा शब्द मूळ फारसी भाषेतला असनू 'गनिमी' हे त्या शब्दाचे षष्ठ्यंतरूप आहे. 'कावा' या शब्दाला लक्षणेने 'फसवणूक', धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत. कावा या शब्दाचा वाच्यार्थ पार पुसला जाऊन लक्षणेने या शब्दला आलेला अर्थ प्रभावी ठरला आणि 'शत्रुचा कपटयुक्त हल्ला' अथवा 'कपट-युद्ध' असा 'गनिमी कावा' या संज्ञेचा अर्थ रूढ झाला. प्रश्‍न असा उद्‍भवतो की 'शत्रूचा कपटयुक्त हल्ला' या शब्दाप्रयोगात शत्रू कोण?

मराठ्यांच्या युद्धपद्धतीच्या निदर्शनात होत असल्याने गनीम म्हणजे मराठा असा अर्थ निघतो। म्हणजे 'गनिमी कावा' ही संज्ञा मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीसाठी योजली हे स्पष्ट आहे. या शब्दाप्रयोगात अवहेलना स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. हे लक्षात घेता आपणही मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख 'गनिमी कावा' असाच करतो आणि मनात नसताही मराठ्यांच्या शौर्याचे अवमूल्यन करण्याचे कामी आपणही मराठ्यांच्या शत्रूची साथ करीत असतो हे आपल्या लक्षातही येत नाही!

मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख 'गनिमी कावा' या शब्दात केला आहे तो आत्मसमर्थनार्थ। मराठ्यांनी जिंकलेल्या सर्वच लढायांत ‍आदिलशाही वा मोगल या दोन्ही शत्रूपक्षाचे सैन्यबळ तुलनेने अधिक होते. युद्धसामग्री आणि कोशबळ यांच्या बाबतीतही या दोन्ही सत्ता वरचढ होत्या. असे असताना त्यांचा पराभव युद्धात झाला याचे समर्थन कसे करणार? मराठ्यांच्या शत्रूंचे समर्थन असे की, 'आम्ही लढाई सहज जिंकली असती, परंतु गनीम (मराठे) काव्याने (कपटाने) लढले म्हणून ते विजयी झाले!'' 'गनिमी कावा' हा शब्दप्रयोग रूढ झाला तो असा. शत्रूने केलेली अवहेलना आपण मानाची बिरूदावली समजून स्वीकारली आहे. याचे कारण, मराठ्यांनी कालपरिस्थित्यनुरूप स्वत:चे असे युद्धतंत्र विकसित केले होते याची जाणीवच आपल्याला आहे असे दिसून येत नाही.

'धूर्तपणा', 'कपट', 'कावेबाजपणा' अशा प्रकारचे लाक्षणिक अर्थ 'कावा' या शब्दाला प्राप्त झालेले आहेत। कोणत्याही शब्दाला वाच्यार्थ असल्याविना त्याच्याभोवती लक्षणेने निर्माण झालेली अर्थवलये गोळा होत नसतात हे भाषाविज्ञानाचे तत्त्व आहे. त्याचप्रमाणे वाच्यार्थाची काही चिन्हे लक्षणेने येणार्‍या अर्थात कुठे तरी दडलेली असतात. या सिद्धांतास अनुसरून 'कावा' या शब्दास असलेला मूळ अर्थ लक्षात घेतला पाहिजे.

'महराष्ट्र शब्दकोशा'त कावा या शब्दाचे पाच अर्थ दिले आहेत। त्यंपैकी शेवटचे चार या शब्दाला लक्षणेने प्राप्त झालेले असून ते असे आहेत : 2. लुच्चेगिरी, 3. गुप्तकट, 4. हुलकावणी आणि 5. पीछेहाट. 'कावा' या शब्दाचा वाच्यार्थ प्रथम देण्यात आला आहे तो असा : घोड्याची रग जिरविण्यासाठी त्या घ्यावयास लावलेले फेरे, मंडले, घिरटी, फेर, घोडा भरधाव पळत असता त्याला वाटेल तसा ‍वळविणे, फिरविणे, मंडळाकार आणणे, पुढे मागे भरधाव सोडणे'. 'गनिमी काव्या'च्या मूळ स्वरूपाचा शोध या वाच्यार्थास प्रमाण मानल्यानंतर कसा लागतो हे आता आपण पाहू.

कावा हा शब्द घोड्यांना देण्यात येणार्‍या प्रशिक्षणाशी संबंधित आहे। पोलीस-दलात आणि सैन्यातही बाळगण्यात येणार्‍या घोड्यांना विशिष्ट प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक असते। तसे झाले तरच त्या त्या दलांच्या कार्यात घोडा उपयुक्त ठरतो। मराठ्यांच्या लष्करात घोड्यांना देण्यात आलेले शिक्षण प्रामुख्याने 'काव्या'चे होते. भरवेगात धावणार्‍या घोड्याचा वेग यत्किंचितही मंद होऊ न देता नि‍रनिराळ्या दिशांनी आणि उलटसुलट वळण घेण्यात मराठ्यांचे लष्करी घोडे तरबेज असत. वेग मंद करून हव्या त्या दिशेने वळणे घेणे हे घोडा आणि घोडेस्वार या दोघांनाही अवघड नसते. परंतु वेग मंदावला असताना दिशा वा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केल्यास समोरच्या माणसास वा शत्रूस तो कोणत्या बाजूने वळण घेणार आहे याचा अंदाज बांधता येतो. रणक्षेत्रात धावत्या घोड्यांच्या बाबतीत अशा प्रकारचा अंदाज बांधणे शत्रूस शक्य होऊ नये या हेतूने अनपेक्षित वळणे घेण्याचे शिक्षण लष्करी घोड्यांना देण्यात येत असे. तोच 'कावा'. ही वळणे घोडेस्वार युद्धाच्या सोयीच्या दृष्टीने घेत असतो. भरधाव दौडत येणारा वारू शत्रूची दिशामूल होते. काव्याच्या युद्धात शत्रूची दिशाभूल हे प्रधान उद्दिष्ट असते. अशा प्रकारची अनपेक्षित म्हणूनच फसवी वळणे घेऊन मराठ्यांचे घोडदळ लढत असे म्हणूनच मराठ्यांच्या शत्रूंनी या युद्धपद्धतीस 'गनिमी कावा' हे नाव दिले. या नावात मूळातच एक युद्धतंत्र दडलेले आहे ते दुर्लक्षित राहिल्याने 'गनिमी कावा' वा केवळ 'कावा' या शब्दास लक्षणेने 'कपट', फसवणूक' यांसारखे अर्थ प्राप्त झाले.

(शिवकालीन राजनीती आणि रणनीती या पुस्तकातून साभार) - श्रीधर रंगनाथ कुलकर्णी

बहूजनांसी आधारू

शेतकरी हा राज्याचा अन्नदाता आहे, असा विचार छत्रपती शिवरायांनी रयतेला दिला। छत्रपतींच्या सैन्यात सर्वाधिक शेतकर्‍यांची मुले होती, हे जाणूनच शेतकर्‍यांचे हित जपणे हे ते आद्यकर्तव्य मानत. शेतकर्‍यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शिवबा सर्वाधिक उत्पन्न काढणार्‍या शेतकर्‍यांना पुरस्कार देऊन गौरवित असत. अल्पभूधारक व कमी उत्पन्न असणार्‍या शेतकर्‍यांना शिवकाळात मोफत बी-बीयाणे पुरविली जायची. याशिवाय शेतीमालाला योग्य किंमत देऊन शेतसाराही किफायतशीर प्रमाणात आकारला जात असे.

पडिक जमिनीची मशागत करणार्‍या शेतकर्‍यांना राज्याकडून अर्थपुरवठा केला जात असे। दलालांची प्रथा तर छ‍त्रपतींनी पुर्णत: नष्ट केली होती. बहुजन समाजातील लायक व्यक्तिंना महसूल अधिकारी म्हणून नेमण्याची पद्धत शिवरायांच्या कारकिर्दीतच सुरु झाली. दुष्काळाच्या काळात शिवकाळात शेतकर्‍यांना शेतसारा माफ करुन त्यांच्या गुरांसाठी मोफत चारा पुरविला जात असे. शेतकर्‍यांच्या भाजीच्या देठालाही हात लाऊ नये, मोबदला दिल्यशिवाय फळे घेऊ नका, झाडे तोडू नका, असे कडक फर्मान छत्रपतींनी महसूल अधिकार्‍यांना काढले होते. शेतकर्‍यांची आर्थिकस्थिती सुधारली तर देशाला संपन्नता येईल, असे मत राजेंचं होतं. म्हणूनच छत्रपती हे रयतेचा राजा म्हणून जनमानसात संबोधले गेले.

परस्त्रीप्रति आदर
स्त्री ही कुठलीही असो, प्रत्यक्ष शत्रुच्या मुलखातील जरी असली तरी ती अखेर मातेसमानच असते, असा विचार छत्रपतींनी रयतेला दिला। शत्रुच्या स्त्रियांना सन्मानाने वागवणारा शिवबा अशी जनमानसात त्यांची ख्याती होती. त्यांच्या कारकिर्दीत स्त्रियांना सैन्यापासून तसूभरही भय नसे. एक चारित्र्यसंपन्न राजा म्हणून त्यांची ओळख होती. परस्त्रीचा आदर-सन्मान करणे, हा आमचा राजधर्म आहे, असे हे म्हणत. स्त्रिचा अनादर केल्याबद्दल शिक्षा म्हणून शिवबांनी एका गावप्रमुखाचे हातपाय तोडण्याचे हुकूम बजावले होते. आबाजी सोनदेवने कल्याणच्या सुभेदारची सून महाराजांसमोर पेश केली असता, महाराजांनी लगेचच त्या स्त्रीला सन्मानपूर्वक घरी पोहोचविण्याचे आदेश जारी केले. परस्त्रीविषयी महाराजांच्या मनात नितांत आदर होता.

सर्वधर्मसमभावाचे पुरस्कर्ते
शिवकालीन इतिहासात देवळांप्रमाणे मशिदांनाही सरकारी तिजोरीतून अर्थसहाय्य देण्यात येत असे। शिवकालीन धर्म म्हणजे स्वराज्याचे व परंपरेचे रक्षण करुन, रयतेत आत्मविशवास व चैतन्य निर्माण करणे होय. मोहिमेवर असताना मुसलमानांच्या तसेच अन्य धर्मियांचे धर्मग्रंध व धर्मस्थळांचा आदर करावा, असा छत्रपतींचा सैन्यांना हुकूम असायचा. शिवरायांचे धार्मिक धोरण खर्‍या अर्थाने उदार होते. महाराजांच्या आरमारात दर्यासारंग दौलतखान, इब्राहिम खान सारखे अनेक मुस्लीम अधिकारी होते. इतकेच नव्हे तर, त्यांच्या लष्करात विविध पदांवर 700 हून अधिक पठान कार्यरत होते. राजधर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म होय, असे ते म्हणत. युद्धभूमीवर सापडलेली कुराणाची प्रत त्यांनी मौलवीकडे सोपविण्याची घटना सर्वश्रुत आहे.

शिवबा हे एक चारित्र्यसंपन्न व परधर्माप्रति सहिष्णुता बाळगणारे राजे होते. उच्च पदावर नेमणूक करताना त्या व्यक्तिची जात-धर्म न पहाता देशप्रेम, राजाप्रती आदर, निष्ठा, युद्धनैपुण्य हे गुणवैशिष्टये परखूनच ते त्या व्यक्तीची नियुक्ती करित असत. सर्वधर्मसमभाव हा मूलमंत्र छत्रपतींनी आयुष्यभर जोपासला. त्याचबरोबर छत्रपतींनी धर्म व राजकारण याची फारकत करुन सर्वधर्मसमभावाची रयतेला शिकवण दिली.

रायगडाला जेव्हा जाग येते....

भारतात इंग्रज अंमल प्रस्थापित झाल्यानंतर मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास, गड, किल्ले, समाध्या आणि पुतळे उपेक्षेच्या गर्तेत कोसळले। संस्थानिक, जमीनदार, वतनदार आणि मनसबदारांनी इंग्रजांची तळी उचलून धरायला सुरवात केली आणि महाराष्ट्राला स्वाभिमानाचा म्हणून काही इतिहास उरलाच नाही. उलट लाचारीचा वर्तमान काय तो समोर राहीला. ज्याने मराठ्यांचा स्वाभीमान जागविला, उत्थानाची प्रेरणा दिली त्या शिवाजी महाराजांची समाधी तर रायगडावरील भग्नावशेषांत उन, पाऊस आणि वारा खात एकाकी पडली होती।

जेम्स डग्लस या इंग्रज अधिकार्‍याने शिवरायांच्या समाधीच्या उपेक्षेकडे लक्ष वेधले। १८८३ मध्ये त्याने रायगडाला भेट दिली। औरंगाजाबेच्या मोगली सत्तेशी टक्कर देऊन रयतेचे हिंदवी स्वराज्य उभारणार्‍या या मराठी राजाच्या समाधीच्या दुरवस्थेने तो इंग्रज अधिकारीही हेलावला. त्यावेळी रायगडावरील मंदिर भग्न झाले होते. महाराजांची मूर्तीची अवस्थाही चांगली नव्हती. त्याने आपल्या 'अ बुक ऑफ बॉम्बे' या पुस्तकांत ही अवस्था लिहिली. एक मोठे साम्राज्य उभारणार्‍या या राजाच्या समाधीसाठी आज साधा रूपयाही खर्च होत नाही. कुणी त्याकडे ढुंकूनही बघत नाही, अशा शब्दांत त्याने तत्कालीन मराठी समाजाची लक्तरे काढली. एवढे करून डग्लस थांबला नाही. त्याने ब्रिटीश सरकारलाही या समाधीकडे लक्ष द्यायला सांगितले. भलेही शिवाजी महाराजांचे राज्य आज ब्रिटिशांच्या ताब्यात आले असले तरी तो एक मोठा राजा होता, याकडे त्याने लक्ष वेधले.

डग्लसचे प्रयत्न अगदीच वाया गेले नाहीत। समाधीची अवस्था कळाल्यानंतर तत्कालीन समाजातही संतापाची भावना उसळली। त्याचबरोबर राजांच्या देदिप्यमान पराक्रमानंतर वतनदारी, जमीनदारी उबवणार्‍या सरदार-दरकदारांवर ही चीड व्यक्त झाली. एकूणच प्रजेचा दबाव वाढू लागल्याने ब्रिटिश सरकारने पुरातत्व खात्याकडे या समाधीची व्यवस्था सोपवली.

पण हे केले ते ब्रिटिश सरकारने। शिवाजी महाराजा आपले राजे होते, त्यांच्यासाठी आपण काय केले ही भावना उरतेच। मग त्यावेळी महाराष्ट्रातील बुद्धिजीही एकत्र आले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात हिराबागेत १८८६ मध्ये एक बैठक झाली. तीत अनेक मराठा सरदार, वतनदार आणि कोल्हापूर संस्थानचे प्रतिनिधीही उपस्थित होते. पण बैठका होऊनही काहीही ठोस असे झाले नाही. हे सगळे होत असताना इतर व्यापात गुंतलेले लोकमान्य टिळक काहीसे दूरच होते. मग काही वर्षांनी व्ही. एन. मंडलिक या गृहस्थांनी १८९५ मध्ये पुन्हा रायगडला भेट दिली, त्यावेळी समाधीची अवस्था फारशी बदलली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मग नेटिव्ह ओपिनियनमध्ये यासंदर्भात एक लेख लिहिला. त्यात डग्लसच्याच म्हणण्याची री ओढली.

त्याचवेळी डग्लसने आणखी भर घालून काढलेल्या त्याच्या बॉम्बे अँड वेस्टर्न इंडिया या पुस्तकात पुन्हा तोच लेख छापला। या एकूणच प्रयत्नांनी वातावरण चांगलेच तापले। मग टिळकांनी हा विषय हातात घेतला. त्यांनी केसरीत २३ एप्रिल १८९५ मध्ये एक सणसणीत लेख लिहिला. त्यात मराठी माणसाच्या निष्क्रियतेवर टीका करताना शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे लाभ उचलणार्‍या त्या पिढीतील सरदार, वतनदारांवरही चांगलीच झोड उठवली.

टिळकांच्या या लेखाने योग्य तो परिणाम साधला। आता लोकभावना चांगल्याच तापल्या होत्या. महाराजांच्या समाधीसाठी आता काही तरी ठोस केले पाहिजे ही भावना तयार झाली. मग त्यातून निधी उभारण्याची संकल्पना पुढे आली. त्यातून रायगडावरील शिवकालीन साधनांची दुरूस्ती करून तेथे दरवर्षी महाराजांची जयंती साजरी करण्याचे ठरले. हा मुद्दा त्यावेळी एवढा पेटला की तो केवळ महाराष्ट्राचा राहिला नाही. एक तर आधीच ब्रिटिश अंमल असल्यामुळे छत्रपती शिवाजी हे आपोआपच राष्ट्रभक्तीचे प्रतीक बनले. मग काय पश्चिम बंगाल, आसाम संयुक्त प्रांत इकडेही शिवाजी महाराजांचे वारे पसरले. जणू एक राजकीय चळवळच तयार झाली.

टिळकांनी आता सर्व सूत्रे हाती घेतली। त्यांनी रानडेंप्रमाणेच ३० मे १८९५ मध्ये हिराबागेत बैठक घेतली. तीत एक स्मारक समिती स्थापन करण्यात आली. पन्नास सदस्यांच्या या समितीत स्वतः टिळकही होते. वास्तविक त्यावेळी सरकारही समाधीच्या दुरूस्तीसाठी पैसे देत होते. पण ती रक्कम होती वर्षाला पाच रूपये. मराठा साम्राज्याची निर्मिती करणार्‍या छत्रपतीच्या वाट्याला ही अवस्था यावी? टिळकांनी या बैठकीत सगळ्यांनाच चांगले खड़सावले. ही बाब आपल्याला शोभनीय नाही, हे त्यांनी लक्षात आणून दिले आणि ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून निधी उभारण्याचे ठरले. अगदी एका विद्यार्थ्याकडून मिळालेले दोन आणे ते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळालेले एक हजार रूपये अशा प्रकारे निधीची उभारणी सुरू झाली. अवघ्या सहा मिहन्यात नऊ हजार रूपये जमले.

लोकांच्या या प्रतिसादाने सर्वच जण भारावून गेले। एवढा प्रतिसाद सर्वस्वी अनपेक्षित होता. मग त्याचवेळी हाही निर्णय घेण्यात आला की शिवजयंती आता उत्साहात आणि दणक्यात साजरी करण्यात यावी. पूर्वी ती रायगडाखाली महाडला साजरी व्हायची. यानंतर मात्र, ती रायगडावरच साजरी करण्याचे ठरले. त्यासाठी नियमावलीही करण्यात आली.

अर्थात शिवजयंती उत्सव साजरी करण्यासाठी ब्रिटिशांनी सहजासहजी परवानगी दिली नाही। सुरवातीला मागणीच फेटाळण्यात आली. कारण काय तर रायगड हा जंगल भाग आहे, म्हणून. दुसर्‍या वेळेला यात्रा असा उल्लेख होता, म्हणून. मग उत्सव असा शब्द टाकल्यानंतर एकदाची परवानगी मिळाली. त्यासाठी टिळकांना फार यातायात करावी लागली. महाबळेश्वरमध्ये सुटीवर असलेल्या ब्रिटिश गव्हर्नरला जाऊन ते भेटले. उत्सवावेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची हमी त्यांना दिली. त्यानंतर मग ही परवानगी मिळाली.

एवडे सव्यापसव्य करूनही पहिली सार्वजनिक शिवजयंती दणक्यात साजरी झाली। २१ एप्रिल १८९६ च्या केसरीत छापलेल्या वृत्तानुसार या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून आलेले तब्बल सहा हजार लोक उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकानंतर रायगडावर झालेला सर्वांत मोठा कार्यक्रम हाच ठरला. कारण मधल्या काळात कोणताही एवढा मोठा कार्यक्रम रायगडावर झाला नव्हता. टिळकांच्या या प्रयत्नाने 'रायगडाला पुन्हा एकदा जाग आली'. हिंदवी स्वराज्य उभारणार्‍या छत्रपतींचा तेजस्वी इतिहास रायगड पुन्हा एकदा दिमाखात सांगू लागला....
सौजन्या - अभिनय कुलकर्णी

Friday, 30 January 2009

नेताजी पालकर

नेताजी पालकर हे दीर्घ काळ स्वराज्याचे सरनौबत होते। त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणजेच 'दूसरा शिवाजी' असेही म्हटले जायचे. नेताजी मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरुर गावचे. त्यांनी अनेक युद्धे गाजवली होती. अफजलखान वधाच्या वेळी अफजल खानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. पण पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांशी झालेल्या काही वादामुले त्यांना स्वराज्यापासून दूर जावे लागले होते तेव्हा त्यांनी मुघलांची चाकरी केली.पण पच्छाताप झाल्यामुले तब्बल नऊ वर्षांनी नेताजी पुन्हा स्वराज्यात आले.मुघलान्नी त्यांना आणि त्यांच्या भावाला जिवाची धमकी देऊन मुसलमान होण्यास प्रवृत्त केले होते. पण स्वराज्यात पुन्हा आल्यावर शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधि पर पाडून त्यांना हिन्दू धर्मात प्रवेश दिला होता.शिवाजी महाराजांनंतर त्यांनी संभाजी महाराजांची ही चाकरी केली होती.

पुरंदर तहानंतर शिवाजी महाराज, मिर्झा राजे, नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले। तेथे आदिलशाही सेनापति सर्जाखान याच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते. आणि त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्या साठी महाराज विजापुरहून परत आले, महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती पण किल्लेदार सावध होता. त्यात नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे १००० माणसे मारली गेली.महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे "समयास कैसा पावला नाहीस" असे म्हणून बडतर्फ केले.मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले.

शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यातुन औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि।१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते.दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. दि.२७ मार्च १६६७ रोजी नेताजी मुसलमान झाले व त्यांचे 'महम्मद कुलिखान' असे नामकरण करण्यात आले.जून १६६७. औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले.लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.

शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली। बाटून ९ वर्षे उलटल्यावर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. मग त्याने या 'मुहंम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले.मे १६७६. रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले.१९ जून १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.

महाराज व नेताजी नातलग आहेत असे उल्लेख मोगली अखबारातून मिळतात. महाराजांची पत्नी पुतळाबाई राणी साहेब यांचे माहेर पालकर घराण्यातले आहे. महाराजांची एक राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले. पण जानोजी अन् पुतळाबाई हे नेताजी नेमके कोण हे फार मोठे प्रश्णचिन्ह अजूनही आहे.'छावा' नुसार नेताजी पालकर शिवरायांच्या एक महाराणी सगुणाबाई यांचे सख्खे काका होते.[स्रोत- वरील सर्व माहिती राजा शिवछत्रपति (लेखक- बाबासाहेब पुरंदरे) आणि छावा (लेखक- शिवाजी सावंत) या दोन ग्रंथानमधून घेतलेली आहे.]

बाजीराव पेशवे - सारांश.

बाळाजीच्या मृत्युनंतर "पेशवेपदासाठी" दरबारी लोकांत अहमिका लागली, त्यांत बाजीरावास परंपरागत देऊ नये असे इतर दरबारी म्हणु लागले. त्याला २ कारणे होती - १)यादवकालीन राजकारणा पासुन ते ताराराणी पर्यंत राजकारणावर देशस्थांचा पगडा होता ते वर्चस्व पुन: प्रस्थापित व्हावे असे देशस्थांना वाटणे स्वाभाविक होते. २)थोरला बाजीराव हा फटकळ होता, एक घाव दोन तुकडे हाच त्याचा स्वभाव होता. मुत्सद्देगिरीपेक्षा त्याला समशेर जवळची होती. हे तरुण रक्त आपल्याला भारी पडणार हे लक्षात येताच शाहु महाराजांनी त्यांचा निर्णय बदलावा असे त्यांना सांगितले. मात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे शाहु महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यास दिली. बाजीराव शिपाईगडी होता. उण्यापुर्‍या ४० वर्षांच्या आयुष्यात त्याने अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्युपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्याने २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा(डिसेंबर,१७२३), धर(१७२४), औरंगाबाद(१७२४), पालखेड(फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद(१७३१)उदय्पुर(१७३६), फिरोजाबाद(१७३७), दिल्ली(१७३७), भोपाळ(१७३८), वसईची लढाई(मे,१७,१७३९) या आणि अशाच३६ मोठ्ठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया तो जिंकला आहे. थोडक्यात त्याचा "सक्सेस रेट" "१००%" आहे. वेगवान हालचाल हेच त्याचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरुन प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्याची रणनीती आपण "मैदानी लढाई" लढुन जिंकु शकतो हे मराठी सैन्याला जाणवुन द्यायला कारणीभुत झाली. बर्नाड मोन्ट्गोमेरी(Bernard Law Montgomery) या ब्रिटीश ’फिल्ड्मार्शल’ ने बाजीरावाची स्तुती पुढील प्रमाणे केली आहे - "The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility". उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता.

पहील्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि सातार्‍याच्या राजगादी इतकेच महत्व पुण्याला मिळवुन दिले. शनिवारवाड्या बद्दल एक दंतकथा सांगितली जाते - बाजीरावाने त्या ठीकाणी एका सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले, त्याला त्याचे आश्चर्य वाटले, त्या जागी मग त्याने भुईकोट कील्लाच बांधुन घेतला हाच तो शनिवारवाडा. तसे बघता ती जागा पेशव्यांना लाभली असे म्हणायला हरकत नाही कारण नंतर स्वराज्यावर चालुन येणारे ’शिकारीकुत्रे’ खरच स्वराज्याला घाबरु लागले.

दिल्लीचा वजिर "मोहम्मद खान बंगेश" छत्रसाल बुंदेल्यावर चालुन आला। तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली। बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकालेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपुर उतरले होते। त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले। मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवुन त्याने हेरां मार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. "जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥" - याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधिशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा "गजांतमोक्षाचा" हवाला देउन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालुन गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाहि. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावाता पुढे मोगल हैराण झाले. खुद्द बंदीस्त वजिरानेच "बम्मन होने के बावजुद क्या समशेर चलाता है?" अशी स्तुति केली.या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तिस लाखाचे उत्पन्न असलेला मुलुख बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्नींपैकी एकीची मुलगी "मस्तानि" बाजिरावास दिली, जेणेकरुन बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळतिल.


या शिवाय बाजीरावास "काशीबाई" ही प्रथम पत्नी होतीच. काशीबाई पासुन बाजीरावास रामचंद्र उर्फ रघुनाथराव, जनार्दन व बाळाजी उर्फ नाना असे ३, तर मस्तानी कडुन समशेरबहद्दर उर्फ कृष्णराव असे एकुण ४ पुत्र होते. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधुन घेतला.चिमाजी अप्पा हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने देखिल कोकण घाट आणि कीनार्‍यावर मराठीसत्तेचा भगवा फडकवत ठेवला.बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाउ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगिजांना त्यांची जागा दाखवुन दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगिजांकडुन ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकुन घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला किर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेउन गेली. त्याची जाणिव ठेवुन चिमाजीने वसई जवळच "वज्रेश्वरी" देवीचे सुंदर मंदिर बांधले.

बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासुन रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडुन गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकुन मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडुन, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४०(वैशाख शुध्द शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले. बाजीराव हा ६ फुट होता, असा उल्लेख आहे. उंची बरोबरच त्याचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबुस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीहि मोहीत व्हाव असा मोहक चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तीमत्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्याला तिटकारा होता, स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरी. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकरा शिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते - निळा, गंगा, सारंगा आणि अबलख अगदी त्यांचे दाणावैरण पाणी स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभ सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाल होतं. थोरले बाजीराव हे जगातील एकमेव अपराजित सेनापती होते.

Tuesday, 27 January 2009

महाराजांनी राज्याभिषेक का करवून घेतला?

रणजीत देसाई यांच्या ‘ श्रीमान योगी ’ या पुस्तकाची नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेली प्रस्तावना ही श
िवचरित्राचे महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते। याच प्रस्तावनेत कुरुंदकरांनी महाराजांनी राज्याभिषेक का करवून घेतला ते सांगितले आहे. तो भाग या प्रस्तावनेतून जसाच्या तसा... ................................... इ. स. १६७४ ला शिवाजीने स्वतःला राज्याभिषेक करण्यासाठी हजार प्रयत्न करून, आपले क्षत्रियत्व त्याने सिद्ध केले. मुंज केली. प्रायश्चित्तं घेतली. स्वतःच्या पत्निंशीच नव्याने लग्ने केली. अभिषेकाचा इतका खटाटोप शिवाजीने का केला असा एक प्रश्न आहे. बेंद्रे यांचे म्हणणे असे की, ब्राह्मण गुन्हेगारांना शासन करणे, धार्मिक प्रश्नावर निकाल देणे हा अधिकार यावा म्हणून शिवाजीने राज्याभिषेक करून घेतला. माझे म्हणणे असे की, तो काळ धार्मिक प्रभाव आणइ वर्चस्वाचा काळ आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राज्याभिषेकाला पावित्र्य आणि प्रतिष्ठा आहे. राज म्हणजे मुसलमान, ही त्यावेळची समजूत आहे. दिल्लीपती हा सर्व भारताचा स्वयंभू सम्राट मानला जाई. यामुळे बहामनी घराणे वैभवात असतानाही जनतेला व खुद्द बहामनी वजीरांना आपल्या राज्याचा सम्राट दिल्लीपती व त्याचा अधिपती इराणच खलीफा वाटे. भारताचे अधिपत्य मिळाल्यानंतरही हे अधिपत्य इराणकडून मान्य करून घेणे अल्लाउद्दिनला इष्ट वाटले. औरंगजेबाच्या वेळी खलीफा तुर्की होता. त्याची मान्यता आपल्या अधिपत्याला मिळावी याचा अटोकाट प्रयत्न अलमगीरने केला. शेवटी ती मिळाली तेव्हा, आनंदोत्सव दरबार केला. आदिलशाही, कुतुबशाही, राजांना व सरदारांनासुद्धा दिल्लीपती हा आपल्या पादशाहीचा सम्राट वाटे. शिवाजीच्या वेळी अनेक रजपूत राजे होते. त्यांचे मंचकारोहण होई व तख्तनशीनीचा समारंभही होई. राज्याभिषेक नव्हता. विजयनगरचे साम्राज्य स्थापन झाले. वैभवाला चढले. पण वैदिक विधिपूर्वक राज्याभिषेक नाही. इ. स. १००० च्या नंतर हा वैदिक विधीच लुप्त झाला होता. गागाभट्टाने धर्मग्रंथ पाहून तो नव्याने सिद्ध केला व शिवाजीला राज्याभिषेक केला. ही एक क्रांतिकारक घटना होती. एकीकडे राम, नल, युधिष्ठिर, विक्रमादित्य या परंपरेशी या कृतीने शिवाजी आपला सांधा जोडीत होता. दुसरीकडे अखिल भारतातील हिंदुंच्या धर्मनिष्ठा व धर्माचे सारे पूज्यत्व व पावित्र्य स्वतःमागे उभे करीत होता. आमच्या धर्मशास्त्राप्रमाणे सत्य युगात चार वर्ण असतात. द्वापारयुगात वर्णसंकराला आरंभ होतो. त्रेतायुगात तीन वर्ण राहून संकर वाढतो. कलीयुगात ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ण राहतात. आमच्या पुराणांप्रमाणे नंद घराणे संपले आणि क्षत्रिय संपले. तिथून पुढे शूद्रराजे आरंभ झाले. शिवाजी जणू इतिहासाचे चाक मुस्लीम पूर्व जागेपर्यंत मागे सरकवून हिंदुंच्या वेदपुराणांचा, स्मृतींचा व सर्व हिंदू वैभवाचा स्वतःशी सांधा जोडून नवे युग सुरू झाल्याची द्वाही फिरवू इच्छित होता. शिवराज्याभिषेकाकडे तात्कालिक सोयीचा भाग म्हणून न पाहता, त्या मागची भव्यता समजून घेतली पाहिजे. अभिषेक-विधी बेंद्रे यांनी संपादन केला आहे. आपण आपल्या कादंबरीत या प्रसंगाची सर्व भव्य पवित्र भूमिका ठसठशीतपणे मांडावी असे मला वाटते. स्वतःला वैदिक मंत्रांनी अभिषिक्त करून घेण्याची कल्पना शिवाजीच्या मनात केव्हापासून आली असावी ? मला वाटते, ती फार पूर्वीपासून असावी. कारण त्याने प्रधानाचा शिक्का असा घेतला आहे - शिवनगरपती हर्ष निधान सामराज मतीमत् प्रधान. हा शिक्का १६५३ पासूनचा आहे. यातील हर्षनिधान या विशेषणाला संस्कृत काव्य वाड्मयाची पार्श्वभूमी आहे. अभिषिक्त राजा म्हणजे सर्वांस अभय व न्यायाची हमी, प्रजेच्या नियमांची व सुखाची हमी. मात्सन्यायातील दुःखांपासून प्रजेची सुटका, अशी वर्णने कौटिल्यापासून आहेत. काव्यातही आहेत. अर्थात हे एक माझे अनुमान.

महाराजांचे निष्ठावंत मुस्लिम सरदार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात धर्माला स्थान नव्हते. त्यांच्या राज्यात जीवाला जीव देणारे मुस्लिम सरदार हो
ते आणि त्यांना कायमच मानाचे स्थान मिळाले। महराजांच्या निष्ठावंत मुस्लिम सरदारांची ही ऐतिहासिक कामगिरी... सिद्दी हिलाल घोडदळातील सेनापती सहाय्यक पन्हाळगडाच्या वेढ्यात (२ मार्च १६६०) शिवरायांच्या सुटकेसाठी युद्ध केले। उमराणीजवळ बहलोल खानाशी लढून (१५ एप्रिल १६७३) त्याला शरण येण्यास भाग पाडले. सिद्दी वाहवाह (सिद्दी हिलालचा पुत्र) घोडदळातील सरदार सिद्दी जोहरशी झालेल्या लढाईत जखमी (२ मार्च १६६०) आणि कैद. सिद्दी इब्राहिम शिवाजी महाराजांचा अंगरक्षक, लष्कराचा हजारी, फोंड्याचा किल्लेदार अफजलखानाच्या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांचा अंगरक्षक म्हणून त्याने कामगिरी (१९ नोव्हेंबर १६५९) चोख पार पाडली. सुरुंग लावून फोंड्याचा किल्ला घेतला (एप्रिल १६७५) आणि त्यावर स्वराज्याचे निशाण फडकावले. नूरखान बेग स्वराज्याचा पहिला सरनोबत २१ मार्च १६५७ रोजी स्वराज्याचा पहिला सरनोबत होण्याचा मान पटकावला. दिड लाखाच्या सैन्याचे नेतृत्व करण्याची कामगिरी चोख पार पाडली. मदारी मेहतर विश्वासू सेवक आग्रा येथील बंदीवासातून पळण्यासाठी (१७ ऑगस्ट १६६६) शिवरायांना सर्वतोपरी मदत. काझी हैदर शिवाजी महाराजांचा वकील आणि सचिव १६७० पासून १६७३ पर्यंत शिवाजी महाराजांचा वकील म्हणून काम पाहिले. खास सचिव आणि फारसी पत्रलेखक म्हणून काम पाहिले. शमाखान सरदार कोंढाणा किल्ला स्वराज्यात येताच (फेब्रुवारी १६७०) आसपासचे मोगलांचे किल्ले आणि ठाणी जिंकून घेतली. सिद्दी अंबर वहाब हवालदार जुलै १६४७ मध्ये कोंढाणा सर करताना मोठा पराक्रम गाजवला हुसेनखान मियाना लष्करातील अधिकारी मसौदखानाच्या अदोनी प्रांत हल्ला करुन उध्वस्त केला. बिळगी, जामखिंड, धारवाड (मार्च १६७९) जिंकले. रुस्तमेजनमा शिवाजी महाराजांचा खास मित्र विजापूर येथील गुप्त बातम्या पाठवण्याचे काम चोख पार पाडले. हुबळीच्या लुटीत कामगिरी (६ जानेवारी १६६५) चोख पार पाडली. नेताजी पालकर यांना मदत (१८ मार्च १६६३) केली. सिद्दी मसऊद चालून येत असल्याचे पाहून शिवाजी महाराजांना सावध केले. दर्यासारंग आरमाराचा पहिला सुभेदार खांदेरीवर १६७९ मध्ये विजय मिळवला. बसनूर ७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी १६८५ या काळात लुटले. इब्राहीम खान आरमारातील अधिकारी खांदेरी (१६७९) आणि बसनूरच्या ७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी १६८५ या काळात झालेल्या लढाईत परक्राम केला. दौलतखान आरमाराचा प्रमुख (सुभेदार) उंदेरीवर हल्ला (२६ जानेवारी १६८०) खांदेरीच्या लढाईत पराक्रम (१६७८) सिद्दी संबुळचा पराभव (४ एप्रिल १६७४) सिद्दी मिस्त्री आरमारातील अधिकारी खांदेरी (१६७९), उंदेरी (१६८०), सिद्दी संबुळविरुद्धच्या लढाईत (१६७४) पराक्रम गाजवला. सुलतान खान आरमाराचा सुभेदार शिवाजी महाराजांच्या काळात अधिकारी आणि १६८१ मध्ये सुभेदार. दाऊतखान आरमाराचा सुभेदार अनेक आरमारी लढायांमध्ये पराक्रम गाजवला. सुलतान खान नंतर सुभेदार झाला. पोर्तुगीजांकडून दारुगोळा मिळवण्यात यशस्वी झाला. इब्राहिम खान तोफखान्याचा प्रमुख स्वराज्यातील तोफखान्याचा प्रमुख. डोंगरी किल्ल्याच्या लढाईमध्ये तोफखान्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली. विजापूर आणि गोवळकोंड्यावरुन स्वराज्यात आलेले ७०० पठाण पायदळ आणि घोडदळ १६५८ पासून स्वराज्याची निष्ठापूर्वक सेवा केली. अखेरपर्यंत बेईमानी केली नाही. घोडदळातील चार मोगली पथके घोडदळातील सरदार आणि सैनिक मोगलांना सोडून २६ ऑक्टोबर १६७२ मध्ये आलेल्या या वीरांनी स्वराज्याची निष्ठेने सेवा केली.
(प्रेम हनवते यांच्या 'शिवरायांच्या निष्ठावंत मुस्लिम सैनिक' या पुस्तकामधून...)

Friday, 23 January 2009

बाळाजी विश्वनाथ

महादजी विसाजी देशमुख हा बाळाजीचा पणजोबा व भट घराण्याचा ज्ञात पुरुष। त्यास नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी अशी २ मुले. शिवाजीस ३ पुत्र कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी. विश्वनाथ हा बाळाजीचा पिता. बाळाजीला ४ भाऊ होते. कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल व रुद्राजी. घराणं देशमुखीचं असल्याने बाळजीनानास मोडीवाचन, हिशेब, संध्या-रुद्रादी कर्मे यांच शिक्षण मिळालं. वयाच्या १०-१२व्या वर्षी बर्वे घराण्यातील ’राधाबाई’ हिच्या बरोबर त्यांचा विवाह झाला. इ.स. १६८९ च्या सुमारास म्हणाजे शंभूछत्रपतींच्या हत्येनंतर सिद्दीने उचल खाल्ली त्यामुळे त्याला श्रीवर्धन सोडावे लागले. त्यातच भट घराणे आंग्र्यांना सामिल आहेत या संशयाने सिद्दिने भट घराण्याचा छळ चालु केला. त्यांच्या "जानोजी" नावाच्या भावास सिद्दीने पोत्यात घालुन समुद्रात बुडवल्याची कथा आहे. त्याच किंवा तशाच कारणास्तव पिढीजात देशमुखी सोडून "बाळाजी भट" हे "भानु" कुटुंबा बरोबर सातार्यास आले. सिद्दीच्या हशमांनी पाठलाग सुरु केल्या वर मुरुड येथील "वैशंपायन" कुटुंबाकडे त्यांनी काही आठवडे आश्रय घेतला. पुढे याची आठवण ठेवुन एका "वैशंपायन" गुरुजींना त्यांनी आपले कुलोपाध्याय केले. शिवाय एक वैशंपायन १२०० स्वारांचे सरदार होऊन मध्यप्रदेशात ’सागर’ प्रांतात गेले असा उल्लेख मिळतो. बाळाजी बरोबर असलेल्या "भानु" कुटुंबात ३ भाउ होते. "हरी महादेव, बाळाजी महादेव आणि रामजी महादेव." त्या पैकी "बाळाजी महादेव" हा "नाना फडणवीस" याचा आजा. भट-फडणवी्स-वैशंपायनांचे संबध हे ३ पिढ्या जुने होते. पुढे १७१९ मध्ये दिल्लीस गेलेल्या सैनिकांची मुघलांशी लढाई झाली त्यात "बाळाजी महादेव भानु" कामी आले. म्हणजे पेशव्याच्या खुनाचा प्रयत्न होणार हे कळल्यावर बाळाजी विश्वनाथाचा जीव वाचवायला बाळाजी महादेव त्याच्या पालखित बसला आणि कटवाल्यांकडुन मारला गेला. स्वामीनिष्ठेची हि पराकाष्ठाच होती.

बाळाजी विश्वनाथ याने रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे कोठीवर कारकून म्हणून काम केले। त्यांची हुशारी धनाजी जाधव यांच्या नजरेस आली. धनाजीरावांनी आपले दिवाण म्हणुन आपल्या सेवेस घेतले. याचवेळी ते त्या भागाचे महसूल अधिकारी झाले. दिल्लीचा पातशहा "अबु मुझफ़्फ़र मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर गाझी" स्वत: अवघ्या सामर्थ्यासह महाराष्ट्रावर कोसळला होता. महाराष्ट्राचा छत्रपती त्याने हाल-हाल करुन मारला होता. अशाच अस्मानि-सुल्तानी संकटाला स्वराज्य पडेल ती किंमत देऊन तोंड देत होतं. संताजी-धनाजी, नेमाजी-खंडेराव हे गनिमी काव्याचे डाव टाकत मोठ्या मजला मारीत होते. बाळाजी विश्वनाथ फार जवळुन सगळ अनुभवत होता. १७०५ च्या दरम्यान त्याने देखिल आपली समशेर गाजवली आणि बहुतेक ती जस्तच परजली असावी कारण १६९९-१७०२ मध्ये बाळाजीला पुण्याची सुभेदारी मिळाली होती, आता त्याच बाळाजीला १७०५ च्या गुजरात स्वारीच्या दरम्यान दौलताबाद येथील सुभेदारी देखिल मिळाली. या सुभेदारीच्या काळातील बाळाजीची एक मुद्रा उपलब्ध आहे - "श्री उमाकान्त पदाभोजा भजनाप्रमुन्नते: बाळाजी विश्वनाथस्य मुद्रा विजयहेतराम।"

छ। राजारामांच्या अकाली निधनानंतर ’खेळणा’ उर्फ ’विशाळगडावर’ त्यांच्या ’शिवाजी’ या पुत्रास बसवले. ४ वर्षांचा मुलगा मराठ्यांचा छत्रपती झाला. पुढे ५-६ वर्षे मराठी सत्ता औरंग्याशी झुंजत होती. सातारा, परळी, सिंहगड, पन्हाळगड, विशाळगड असे किल्ले फितुरीने औरंगजेबाकडे आले. विशाळगडासाठी तर त्याने त्या काळी २ लाख रुपये मोजल्याचा पुरावा आहे. तर पन्हाळ्यासाठी त्याने ५० हजार रु. मोजले. १७०४ मध्ये त्याने राजगड व तोरणा घेतला. १७०२ मध्ये सिंहगडाच्या लढ्याच्यावेळी केवळ सामर्थ्य तोकडे पडले म्हणुन प्रदीर्घ लढ्यानंतर तडजोडीची बोलणी करायला मोगलांच्या छावणीत "बाळू पंडीत" म्हणजेच बाळाजी गेला होता. मात्र तत्पूर्वी किल्ला लढवत असताना "दारुगोळा कामी भासतोय, तरी त्वरा करा!" असे दारुगोळा पाठविण्या संबधीचे पत्र त्याने "अंबाजीपंत पुरंदरे" यांना लिहीलेले आढळते.

औरंगजेबाच्या मृत्युपश्चात शाहु महाराजांची सुटका झाली. या वेळी बाळाजीने शाहूंचा पक्ष घेतला. अर्थातच स्वराज्याच्या २ गाद्या तयार झाल्या. ताराराणींच्या पक्षातले अनेक जण बाळाजीने केवळ स्वत:च्या शब्दावर शाहू महाराजांच्या पक्षात आणले. राज्यकारभार चालवताना तुटलेली माणसे त्यांनी परत जोडली. जर शाहुंचा पाठिंबा लाभला तर आंग्रे सिद्दीशी सहज झुंजु शकतील हे आंग्र्यांना बाळाजीनेच पटवुन त्यांना शाहुंच्या पक्षात आणले. त्यांनी सय्यदबंधू बरोबर तह घडवुन आणला, मग त्यांच्याच सहाय्याने दिल्लीच्या फर्रुखसियर बादशहाला पदच्युत करुन रफिउद्दौरजात याला गादिवर बसवले. याच तहानुसार बाळाजींनी शाहुच्या पत्नींची सुटका करवुन घेतली. मात्र त्यावेळी २ गाद्यांमध्ये जीवघेणा संघर्ष उडु नये म्हणुन बाळजीने केलेली राजकारणे भल्याभयांच्या मतीला गुंग करणारी आहेत. आणि हे केवळ त्याने शब्द सामर्थ्यावर घडवुन आणले होते हे महत्वाचे. १७०७ पासुन पुढे १७२० पर्यंत म्हणजे मृत्युपर्यंत बाळाजीने छत्रपती शाहू महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली. छत्रपती शाहू महाराजांनीच बाळाजीला "पेशवेपद" दिले, अर्थात तो त्या योग्यतेचा होताच, आणि ते पद त्याने सहजगत्या पेलले.

राजे,एवढ भाग्य फक्त पदरात टाका...

इतिहास घडवणारी माणस इतिहास विसरु शकत नाही आणि इतिहास विसराणारी माणस इतिहास घडवू शकत नाही। मराठयांचा इतिहास सुवर्ण अक्षरानी लिहून ठेवावा असा तेजस्विनी इतिहास याच मातीत घडला. मात्र साक्षर मराठे यापासून विलगच राहिले ही आमची शोकान्तिका आहे .असो.... इतिहास जाणुन घेण्यासाठी गोष्टिच्या माध्यमाने सांगायला आणि ऐकायला देखिल आवडेल अशी खात्री बाळगतो ....आणि आज तुम्हाला॥छत्रपति शिवाजी महाराजनबद्द्ल एक कथा सांगतो..
शिवछत्रपती महाराजानी जीवन भर एकच वसा पेलला तो म्हणजे माणूस जोड्न्याचा ॥मराठयानी इतिहास घडविला परन्तु मराठयानी इतिहास लिहला नाही ।शिवाजिनी स्वराज्य उभे केले ते नेमके याच्याच बलावर ... निष्ठा माणस कशाच्या मोहने शिवाजी कडे आली....विश्वास दिला राज्यानी " आपल राज्य उभा करायचा " मला छत्रपती व्हायच म्हणून नाही ....तमाम मराठयांच राज्य निर्माण करायच, रयतेच राज्य गरीबांच राज्य तयार करायच आहे..ही काळजी इथल्या माणसा -माणसा मध्ये होती .... हिरोजी इंदलकर नावाचा बांधकाम प्रमुख शिवाजी महाराज्यानकडे होता.रायगड किल्ला बांधायची जबाबदारी राज्यानी त्याच्यावर सोपावली ...शिवाजी महाराज स्वारी वर गेले...हिरोजीने किल्ला निम्यावर बांधत आणला .. आणि पैसा संपला हिरोजिला समजेणा काय करावे ..शिवाजीने तर जबाबदारी टाकली आहे . किल्ला तर पूर्ण केला पाहिजे.. तर पैसा शिल्लक नाही त्या हिरोजिने अपूर्ण काम केले.आपला राहता वाडा , आपली जमिन विकली. बायकोसह रायगडावर आला.. पैशासह जोपड़ी घेऊन राहू लागला आणि मराठयांची राजधानी बांधून काढली .....
शिवाजीना आल्यावर कळल हिरोजिने काय केले । राज्याभिषेकाच्या वेळी त्या शिवाजिना वाटल या हिरोजिंचा सत्कार करावा ॥राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी म्हणाले, " हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधला , बोला तुम्हाला काय हवय." त्यावेळी हिरोजी नम्रपणे मान ज़ुकवुन म्हणाला ," महाराज , उभ स्वराज्य तुम्ही पदरात टाकल .. आम्हाला आणखी काय हवय...." महाराज म्हणाले नाही काही तरी मागितलेच पाहिजे ,त्यावेळी हिरोजी म्हणाला महाराज एक विनंती आहे ..रायगडावर आम्ही जगदिशवराचे मंदिर उभारल आहे .त्या जगदिशवराच्या एका पायरीवर आमच नाव कोरायची अनुमति आम्हाला दया . महाराजाना कलेना हे कसल मागण॥पगार वाढ नाही मागितली, देशमुखी नाही मागितली, पाटीलकी नाही मागितली , वतन नाही मागितल ...मागुन मागितले तर काय दगडावर नाव कोरयची परवानगी महाराजानी विचारल हिरोंजी अस का ...????आणि हिरोंजी उत्तर देतात, " राजे..! ज्या-ज्या वेळी रायगडावर असाल,त्या- त्या वेळी जगदिशवराच्या दर्शनाला तुम्ही याल... ज्या-ज्या वेळी दर्शनाला जाल ..त्या-त्या वेळी तुमची पाऊल त्या पायारीवर पडत जातील ...आणि महाराज त्यातल्याच जर एका पायरी वर माजे नाव कोरले असेल ..तर त्या- त्या वेळी तुमच्या पाऊलाची पायधूळ म्हणजे माज्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहिल.."राजे,एवढ भाग्य फक्त पदरात टाका...

हिंदूपतपातशाहीतील संक्रांतिची भयाण आठवण

आज संक्रांत. संक्रांतिचा दिवस म्हटला की मला आठवतो तो १० जानेवारी १७६० चा दिवस. यमुना नदीच्या काठचा बुराडी घाट. याच घाटावर अब्दाली, नजिबखान रोहिला आणि कुतुबशहाने दत्ताजी शिंद्यांवर छापा घातला. घनघोर रणसंग्राम झाला. जंबुर्‍याच्या गोळ्याने जखमी होवून दत्ताजी शिंदे पडले.दत्ताऽऽऽ" म्हणून कुतुबशहाने हाक दिली तसे दत्ताजींनी त्याच्यावर डोळे रोखले. जणू काही डोळ्यांतच अंगार फुटावा तसे डोळे भयंकर दिसू लागले. कुतुबशहा खिंकाळत म्हणाला," क्यूं पटेल, और लढोगेऽऽऽ?"आपला थंड पडत चाललेला आणि मंद मंद होत चाललेला आवाज दत्ताजींनी एकवटला आणि ते बाणेदारपणे उद्गारले,"क्यूं नही ? बचेंगे तो और भी लढेंगेऽऽऽऽ!"कुतुबशहा व नजिब चिडून दत्ताजींच्या उरावर जावून बसले अन् खंजीराने दत्ताजींची गर्दन चराचर चिरली. नजीब भाल्याच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला.त्या दिवशी दिवसभर मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता. कोंबड्या बकर्‍यांसारखी माणसं टिपून मारली जात होती. यमुना काठ रक्तानं निथळत होता.रात्रीच्या भयाण अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड बाहेर काढले. खिळखिळ्या झालेल्या तोफेचं लाकूड सामानं एकत्र केलं.यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडावाघडा देह झाकला. बटव्यातल्या सुपार्‍या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला, अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. भयाण रात्रीच्या घोंगावत्या वार्‍यात आणि यमुना नदिच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्याला. उघड्यावरच आग लावली.दिवशी महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ, रेवड्या वाटल्या जात होत्या. सणासुदीची माणसं भरपेट खाऊन उताणी झाली होती. तेव्हा कण्हेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळून पोसलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता !

--ओमकार

Monday, 24 November 2008

जाणता राजा

शिवरायाची आठवावे रूप ! शिवराजांचा आठवावा संक्षेप !
शिवरायाचा आठवावा प्रताप ! या भुमंद्ली !! १ !!
शिवराजाचे कैसे बोलने ! शिवराजाचे कैसे चालने !
शिवराजाचे सलगी देणे ! कैसे आसे !! २ !!
सकल सुखांचा केला त्याग ! करुनी साधिजे योग !

राज्य साधनेची लगबग ! कैसी केली !! ३ !!
त्याहुनी करावे विशेष ! तरीच म्हनावावे पुरुष !

या उपरी आता विशेष ! काय बोलावे !!!!!!!!

शिवरायांचा पाळणा:-

गुणी बाळ असा जागसि का रे वांया नीज रे नीज शिवराया अपरात्री प्रहर लोटला बाई तरि डोळा लागत नाही

हा चालतसे चाळा एकच असला तिळ उसंत नाही जिवाला निजयावयाचा हरला सर्व उपाय जागाच तरी शिवराय

चालेल जागता चटकाहा
असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका

का कष्टविसी तुझी सांवळी काया नीज रे नीज शिवराया १ ही शांत निजे बारा मावळ थेट शिवनेरी जुन्नर पेठ त्या निजल्या ना तशाच घाटाखाली कोकणच्या चवदा ताली ये भिववाया बागुल तो बघ बाळा किति बाई काळा काळा

इकडे हे सिद्दीजवान
तो तिकडे अफझुलखान
पलिकडे मुलूख मैदान
हे आले रे तुला बाळ धराया नीज रे नीज शिवराया २

प्रभो शिवाजीराजा

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा - स्वातंत्र्यवीर सावरकर