Friday, 30 January 2009

नेताजी पालकर

नेताजी पालकर हे दीर्घ काळ स्वराज्याचे सरनौबत होते। त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणजेच 'दूसरा शिवाजी' असेही म्हटले जायचे. नेताजी मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरुर गावचे. त्यांनी अनेक युद्धे गाजवली होती. अफजलखान वधाच्या वेळी अफजल खानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. पण पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांशी झालेल्या काही वादामुले त्यांना स्वराज्यापासून दूर जावे लागले होते तेव्हा त्यांनी मुघलांची चाकरी केली.पण पच्छाताप झाल्यामुले तब्बल नऊ वर्षांनी नेताजी पुन्हा स्वराज्यात आले.मुघलान्नी त्यांना आणि त्यांच्या भावाला जिवाची धमकी देऊन मुसलमान होण्यास प्रवृत्त केले होते. पण स्वराज्यात पुन्हा आल्यावर शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधि पर पाडून त्यांना हिन्दू धर्मात प्रवेश दिला होता.शिवाजी महाराजांनंतर त्यांनी संभाजी महाराजांची ही चाकरी केली होती.

पुरंदर तहानंतर शिवाजी महाराज, मिर्झा राजे, नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले। तेथे आदिलशाही सेनापति सर्जाखान याच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते. आणि त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्या साठी महाराज विजापुरहून परत आले, महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती पण किल्लेदार सावध होता. त्यात नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे १००० माणसे मारली गेली.महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांनी नेताजीला पत्राद्वारे "समयास कैसा पावला नाहीस" असे म्हणून बडतर्फ केले.मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले.

शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यातुन औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि।१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते.दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. दि.२७ मार्च १६६७ रोजी नेताजी मुसलमान झाले व त्यांचे 'महम्मद कुलिखान' असे नामकरण करण्यात आले.जून १६६७. औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले.लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.

शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली। बाटून ९ वर्षे उलटल्यावर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. मग त्याने या 'मुहंम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले.मे १६७६. रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले.१९ जून १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.

महाराज व नेताजी नातलग आहेत असे उल्लेख मोगली अखबारातून मिळतात. महाराजांची पत्नी पुतळाबाई राणी साहेब यांचे माहेर पालकर घराण्यातले आहे. महाराजांची एक राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले. पण जानोजी अन् पुतळाबाई हे नेताजी नेमके कोण हे फार मोठे प्रश्णचिन्ह अजूनही आहे.'छावा' नुसार नेताजी पालकर शिवरायांच्या एक महाराणी सगुणाबाई यांचे सख्खे काका होते.[स्रोत- वरील सर्व माहिती राजा शिवछत्रपति (लेखक- बाबासाहेब पुरंदरे) आणि छावा (लेखक- शिवाजी सावंत) या दोन ग्रंथानमधून घेतलेली आहे.]

बाजीराव पेशवे - सारांश.

बाळाजीच्या मृत्युनंतर "पेशवेपदासाठी" दरबारी लोकांत अहमिका लागली, त्यांत बाजीरावास परंपरागत देऊ नये असे इतर दरबारी म्हणु लागले. त्याला २ कारणे होती - १)यादवकालीन राजकारणा पासुन ते ताराराणी पर्यंत राजकारणावर देशस्थांचा पगडा होता ते वर्चस्व पुन: प्रस्थापित व्हावे असे देशस्थांना वाटणे स्वाभाविक होते. २)थोरला बाजीराव हा फटकळ होता, एक घाव दोन तुकडे हाच त्याचा स्वभाव होता. मुत्सद्देगिरीपेक्षा त्याला समशेर जवळची होती. हे तरुण रक्त आपल्याला भारी पडणार हे लक्षात येताच शाहु महाराजांनी त्यांचा निर्णय बदलावा असे त्यांना सांगितले. मात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे शाहु महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यास दिली. बाजीराव शिपाईगडी होता. उण्यापुर्‍या ४० वर्षांच्या आयुष्यात त्याने अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्युपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्याने २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा(डिसेंबर,१७२३), धर(१७२४), औरंगाबाद(१७२४), पालखेड(फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद(१७३१)उदय्पुर(१७३६), फिरोजाबाद(१७३७), दिल्ली(१७३७), भोपाळ(१७३८), वसईची लढाई(मे,१७,१७३९) या आणि अशाच३६ मोठ्ठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया तो जिंकला आहे. थोडक्यात त्याचा "सक्सेस रेट" "१००%" आहे. वेगवान हालचाल हेच त्याचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरुन प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्याची रणनीती आपण "मैदानी लढाई" लढुन जिंकु शकतो हे मराठी सैन्याला जाणवुन द्यायला कारणीभुत झाली. बर्नाड मोन्ट्गोमेरी(Bernard Law Montgomery) या ब्रिटीश ’फिल्ड्मार्शल’ ने बाजीरावाची स्तुती पुढील प्रमाणे केली आहे - "The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility". उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता.

पहील्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि सातार्‍याच्या राजगादी इतकेच महत्व पुण्याला मिळवुन दिले. शनिवारवाड्या बद्दल एक दंतकथा सांगितली जाते - बाजीरावाने त्या ठीकाणी एका सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले, त्याला त्याचे आश्चर्य वाटले, त्या जागी मग त्याने भुईकोट कील्लाच बांधुन घेतला हाच तो शनिवारवाडा. तसे बघता ती जागा पेशव्यांना लाभली असे म्हणायला हरकत नाही कारण नंतर स्वराज्यावर चालुन येणारे ’शिकारीकुत्रे’ खरच स्वराज्याला घाबरु लागले.

दिल्लीचा वजिर "मोहम्मद खान बंगेश" छत्रसाल बुंदेल्यावर चालुन आला। तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली। बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकालेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपुर उतरले होते। त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले। मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवुन त्याने हेरां मार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. "जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥" - याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधिशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा "गजांतमोक्षाचा" हवाला देउन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालुन गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाहि. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावाता पुढे मोगल हैराण झाले. खुद्द बंदीस्त वजिरानेच "बम्मन होने के बावजुद क्या समशेर चलाता है?" अशी स्तुति केली.या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तिस लाखाचे उत्पन्न असलेला मुलुख बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्नींपैकी एकीची मुलगी "मस्तानि" बाजिरावास दिली, जेणेकरुन बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळतिल.


या शिवाय बाजीरावास "काशीबाई" ही प्रथम पत्नी होतीच. काशीबाई पासुन बाजीरावास रामचंद्र उर्फ रघुनाथराव, जनार्दन व बाळाजी उर्फ नाना असे ३, तर मस्तानी कडुन समशेरबहद्दर उर्फ कृष्णराव असे एकुण ४ पुत्र होते. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधुन घेतला.चिमाजी अप्पा हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने देखिल कोकण घाट आणि कीनार्‍यावर मराठीसत्तेचा भगवा फडकवत ठेवला.बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाउ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगिजांना त्यांची जागा दाखवुन दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगिजांकडुन ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकुन घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला किर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेउन गेली. त्याची जाणिव ठेवुन चिमाजीने वसई जवळच "वज्रेश्वरी" देवीचे सुंदर मंदिर बांधले.

बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासुन रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडुन गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकुन मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडुन, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४०(वैशाख शुध्द शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले. बाजीराव हा ६ फुट होता, असा उल्लेख आहे. उंची बरोबरच त्याचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबुस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीहि मोहीत व्हाव असा मोहक चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तीमत्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्याला तिटकारा होता, स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरी. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकरा शिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते - निळा, गंगा, सारंगा आणि अबलख अगदी त्यांचे दाणावैरण पाणी स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभ सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाल होतं. थोरले बाजीराव हे जगातील एकमेव अपराजित सेनापती होते.

Tuesday, 27 January 2009

महाराजांनी राज्याभिषेक का करवून घेतला?

रणजीत देसाई यांच्या ‘ श्रीमान योगी ’ या पुस्तकाची नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेली प्रस्तावना ही श
िवचरित्राचे महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते। याच प्रस्तावनेत कुरुंदकरांनी महाराजांनी राज्याभिषेक का करवून घेतला ते सांगितले आहे. तो भाग या प्रस्तावनेतून जसाच्या तसा... ................................... इ. स. १६७४ ला शिवाजीने स्वतःला राज्याभिषेक करण्यासाठी हजार प्रयत्न करून, आपले क्षत्रियत्व त्याने सिद्ध केले. मुंज केली. प्रायश्चित्तं घेतली. स्वतःच्या पत्निंशीच नव्याने लग्ने केली. अभिषेकाचा इतका खटाटोप शिवाजीने का केला असा एक प्रश्न आहे. बेंद्रे यांचे म्हणणे असे की, ब्राह्मण गुन्हेगारांना शासन करणे, धार्मिक प्रश्नावर निकाल देणे हा अधिकार यावा म्हणून शिवाजीने राज्याभिषेक करून घेतला. माझे म्हणणे असे की, तो काळ धार्मिक प्रभाव आणइ वर्चस्वाचा काळ आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राज्याभिषेकाला पावित्र्य आणि प्रतिष्ठा आहे. राज म्हणजे मुसलमान, ही त्यावेळची समजूत आहे. दिल्लीपती हा सर्व भारताचा स्वयंभू सम्राट मानला जाई. यामुळे बहामनी घराणे वैभवात असतानाही जनतेला व खुद्द बहामनी वजीरांना आपल्या राज्याचा सम्राट दिल्लीपती व त्याचा अधिपती इराणच खलीफा वाटे. भारताचे अधिपत्य मिळाल्यानंतरही हे अधिपत्य इराणकडून मान्य करून घेणे अल्लाउद्दिनला इष्ट वाटले. औरंगजेबाच्या वेळी खलीफा तुर्की होता. त्याची मान्यता आपल्या अधिपत्याला मिळावी याचा अटोकाट प्रयत्न अलमगीरने केला. शेवटी ती मिळाली तेव्हा, आनंदोत्सव दरबार केला. आदिलशाही, कुतुबशाही, राजांना व सरदारांनासुद्धा दिल्लीपती हा आपल्या पादशाहीचा सम्राट वाटे. शिवाजीच्या वेळी अनेक रजपूत राजे होते. त्यांचे मंचकारोहण होई व तख्तनशीनीचा समारंभही होई. राज्याभिषेक नव्हता. विजयनगरचे साम्राज्य स्थापन झाले. वैभवाला चढले. पण वैदिक विधिपूर्वक राज्याभिषेक नाही. इ. स. १००० च्या नंतर हा वैदिक विधीच लुप्त झाला होता. गागाभट्टाने धर्मग्रंथ पाहून तो नव्याने सिद्ध केला व शिवाजीला राज्याभिषेक केला. ही एक क्रांतिकारक घटना होती. एकीकडे राम, नल, युधिष्ठिर, विक्रमादित्य या परंपरेशी या कृतीने शिवाजी आपला सांधा जोडीत होता. दुसरीकडे अखिल भारतातील हिंदुंच्या धर्मनिष्ठा व धर्माचे सारे पूज्यत्व व पावित्र्य स्वतःमागे उभे करीत होता. आमच्या धर्मशास्त्राप्रमाणे सत्य युगात चार वर्ण असतात. द्वापारयुगात वर्णसंकराला आरंभ होतो. त्रेतायुगात तीन वर्ण राहून संकर वाढतो. कलीयुगात ब्राह्मण व शूद्र हे दोनच वर्ण राहतात. आमच्या पुराणांप्रमाणे नंद घराणे संपले आणि क्षत्रिय संपले. तिथून पुढे शूद्रराजे आरंभ झाले. शिवाजी जणू इतिहासाचे चाक मुस्लीम पूर्व जागेपर्यंत मागे सरकवून हिंदुंच्या वेदपुराणांचा, स्मृतींचा व सर्व हिंदू वैभवाचा स्वतःशी सांधा जोडून नवे युग सुरू झाल्याची द्वाही फिरवू इच्छित होता. शिवराज्याभिषेकाकडे तात्कालिक सोयीचा भाग म्हणून न पाहता, त्या मागची भव्यता समजून घेतली पाहिजे. अभिषेक-विधी बेंद्रे यांनी संपादन केला आहे. आपण आपल्या कादंबरीत या प्रसंगाची सर्व भव्य पवित्र भूमिका ठसठशीतपणे मांडावी असे मला वाटते. स्वतःला वैदिक मंत्रांनी अभिषिक्त करून घेण्याची कल्पना शिवाजीच्या मनात केव्हापासून आली असावी ? मला वाटते, ती फार पूर्वीपासून असावी. कारण त्याने प्रधानाचा शिक्का असा घेतला आहे - शिवनगरपती हर्ष निधान सामराज मतीमत् प्रधान. हा शिक्का १६५३ पासूनचा आहे. यातील हर्षनिधान या विशेषणाला संस्कृत काव्य वाड्मयाची पार्श्वभूमी आहे. अभिषिक्त राजा म्हणजे सर्वांस अभय व न्यायाची हमी, प्रजेच्या नियमांची व सुखाची हमी. मात्सन्यायातील दुःखांपासून प्रजेची सुटका, अशी वर्णने कौटिल्यापासून आहेत. काव्यातही आहेत. अर्थात हे एक माझे अनुमान.

महाराजांचे निष्ठावंत मुस्लिम सरदार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात धर्माला स्थान नव्हते. त्यांच्या राज्यात जीवाला जीव देणारे मुस्लिम सरदार हो
ते आणि त्यांना कायमच मानाचे स्थान मिळाले। महराजांच्या निष्ठावंत मुस्लिम सरदारांची ही ऐतिहासिक कामगिरी... सिद्दी हिलाल घोडदळातील सेनापती सहाय्यक पन्हाळगडाच्या वेढ्यात (२ मार्च १६६०) शिवरायांच्या सुटकेसाठी युद्ध केले। उमराणीजवळ बहलोल खानाशी लढून (१५ एप्रिल १६७३) त्याला शरण येण्यास भाग पाडले. सिद्दी वाहवाह (सिद्दी हिलालचा पुत्र) घोडदळातील सरदार सिद्दी जोहरशी झालेल्या लढाईत जखमी (२ मार्च १६६०) आणि कैद. सिद्दी इब्राहिम शिवाजी महाराजांचा अंगरक्षक, लष्कराचा हजारी, फोंड्याचा किल्लेदार अफजलखानाच्या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांचा अंगरक्षक म्हणून त्याने कामगिरी (१९ नोव्हेंबर १६५९) चोख पार पाडली. सुरुंग लावून फोंड्याचा किल्ला घेतला (एप्रिल १६७५) आणि त्यावर स्वराज्याचे निशाण फडकावले. नूरखान बेग स्वराज्याचा पहिला सरनोबत २१ मार्च १६५७ रोजी स्वराज्याचा पहिला सरनोबत होण्याचा मान पटकावला. दिड लाखाच्या सैन्याचे नेतृत्व करण्याची कामगिरी चोख पार पाडली. मदारी मेहतर विश्वासू सेवक आग्रा येथील बंदीवासातून पळण्यासाठी (१७ ऑगस्ट १६६६) शिवरायांना सर्वतोपरी मदत. काझी हैदर शिवाजी महाराजांचा वकील आणि सचिव १६७० पासून १६७३ पर्यंत शिवाजी महाराजांचा वकील म्हणून काम पाहिले. खास सचिव आणि फारसी पत्रलेखक म्हणून काम पाहिले. शमाखान सरदार कोंढाणा किल्ला स्वराज्यात येताच (फेब्रुवारी १६७०) आसपासचे मोगलांचे किल्ले आणि ठाणी जिंकून घेतली. सिद्दी अंबर वहाब हवालदार जुलै १६४७ मध्ये कोंढाणा सर करताना मोठा पराक्रम गाजवला हुसेनखान मियाना लष्करातील अधिकारी मसौदखानाच्या अदोनी प्रांत हल्ला करुन उध्वस्त केला. बिळगी, जामखिंड, धारवाड (मार्च १६७९) जिंकले. रुस्तमेजनमा शिवाजी महाराजांचा खास मित्र विजापूर येथील गुप्त बातम्या पाठवण्याचे काम चोख पार पाडले. हुबळीच्या लुटीत कामगिरी (६ जानेवारी १६६५) चोख पार पाडली. नेताजी पालकर यांना मदत (१८ मार्च १६६३) केली. सिद्दी मसऊद चालून येत असल्याचे पाहून शिवाजी महाराजांना सावध केले. दर्यासारंग आरमाराचा पहिला सुभेदार खांदेरीवर १६७९ मध्ये विजय मिळवला. बसनूर ७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी १६८५ या काळात लुटले. इब्राहीम खान आरमारातील अधिकारी खांदेरी (१६७९) आणि बसनूरच्या ७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी १६८५ या काळात झालेल्या लढाईत परक्राम केला. दौलतखान आरमाराचा प्रमुख (सुभेदार) उंदेरीवर हल्ला (२६ जानेवारी १६८०) खांदेरीच्या लढाईत पराक्रम (१६७८) सिद्दी संबुळचा पराभव (४ एप्रिल १६७४) सिद्दी मिस्त्री आरमारातील अधिकारी खांदेरी (१६७९), उंदेरी (१६८०), सिद्दी संबुळविरुद्धच्या लढाईत (१६७४) पराक्रम गाजवला. सुलतान खान आरमाराचा सुभेदार शिवाजी महाराजांच्या काळात अधिकारी आणि १६८१ मध्ये सुभेदार. दाऊतखान आरमाराचा सुभेदार अनेक आरमारी लढायांमध्ये पराक्रम गाजवला. सुलतान खान नंतर सुभेदार झाला. पोर्तुगीजांकडून दारुगोळा मिळवण्यात यशस्वी झाला. इब्राहिम खान तोफखान्याचा प्रमुख स्वराज्यातील तोफखान्याचा प्रमुख. डोंगरी किल्ल्याच्या लढाईमध्ये तोफखान्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली. विजापूर आणि गोवळकोंड्यावरुन स्वराज्यात आलेले ७०० पठाण पायदळ आणि घोडदळ १६५८ पासून स्वराज्याची निष्ठापूर्वक सेवा केली. अखेरपर्यंत बेईमानी केली नाही. घोडदळातील चार मोगली पथके घोडदळातील सरदार आणि सैनिक मोगलांना सोडून २६ ऑक्टोबर १६७२ मध्ये आलेल्या या वीरांनी स्वराज्याची निष्ठेने सेवा केली.
(प्रेम हनवते यांच्या 'शिवरायांच्या निष्ठावंत मुस्लिम सैनिक' या पुस्तकामधून...)

Friday, 23 January 2009

बाळाजी विश्वनाथ

महादजी विसाजी देशमुख हा बाळाजीचा पणजोबा व भट घराण्याचा ज्ञात पुरुष। त्यास नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी अशी २ मुले. शिवाजीस ३ पुत्र कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी. विश्वनाथ हा बाळाजीचा पिता. बाळाजीला ४ भाऊ होते. कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल व रुद्राजी. घराणं देशमुखीचं असल्याने बाळजीनानास मोडीवाचन, हिशेब, संध्या-रुद्रादी कर्मे यांच शिक्षण मिळालं. वयाच्या १०-१२व्या वर्षी बर्वे घराण्यातील ’राधाबाई’ हिच्या बरोबर त्यांचा विवाह झाला. इ.स. १६८९ च्या सुमारास म्हणाजे शंभूछत्रपतींच्या हत्येनंतर सिद्दीने उचल खाल्ली त्यामुळे त्याला श्रीवर्धन सोडावे लागले. त्यातच भट घराणे आंग्र्यांना सामिल आहेत या संशयाने सिद्दिने भट घराण्याचा छळ चालु केला. त्यांच्या "जानोजी" नावाच्या भावास सिद्दीने पोत्यात घालुन समुद्रात बुडवल्याची कथा आहे. त्याच किंवा तशाच कारणास्तव पिढीजात देशमुखी सोडून "बाळाजी भट" हे "भानु" कुटुंबा बरोबर सातार्यास आले. सिद्दीच्या हशमांनी पाठलाग सुरु केल्या वर मुरुड येथील "वैशंपायन" कुटुंबाकडे त्यांनी काही आठवडे आश्रय घेतला. पुढे याची आठवण ठेवुन एका "वैशंपायन" गुरुजींना त्यांनी आपले कुलोपाध्याय केले. शिवाय एक वैशंपायन १२०० स्वारांचे सरदार होऊन मध्यप्रदेशात ’सागर’ प्रांतात गेले असा उल्लेख मिळतो. बाळाजी बरोबर असलेल्या "भानु" कुटुंबात ३ भाउ होते. "हरी महादेव, बाळाजी महादेव आणि रामजी महादेव." त्या पैकी "बाळाजी महादेव" हा "नाना फडणवीस" याचा आजा. भट-फडणवी्स-वैशंपायनांचे संबध हे ३ पिढ्या जुने होते. पुढे १७१९ मध्ये दिल्लीस गेलेल्या सैनिकांची मुघलांशी लढाई झाली त्यात "बाळाजी महादेव भानु" कामी आले. म्हणजे पेशव्याच्या खुनाचा प्रयत्न होणार हे कळल्यावर बाळाजी विश्वनाथाचा जीव वाचवायला बाळाजी महादेव त्याच्या पालखित बसला आणि कटवाल्यांकडुन मारला गेला. स्वामीनिष्ठेची हि पराकाष्ठाच होती.

बाळाजी विश्वनाथ याने रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे कोठीवर कारकून म्हणून काम केले। त्यांची हुशारी धनाजी जाधव यांच्या नजरेस आली. धनाजीरावांनी आपले दिवाण म्हणुन आपल्या सेवेस घेतले. याचवेळी ते त्या भागाचे महसूल अधिकारी झाले. दिल्लीचा पातशहा "अबु मुझफ़्फ़र मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर गाझी" स्वत: अवघ्या सामर्थ्यासह महाराष्ट्रावर कोसळला होता. महाराष्ट्राचा छत्रपती त्याने हाल-हाल करुन मारला होता. अशाच अस्मानि-सुल्तानी संकटाला स्वराज्य पडेल ती किंमत देऊन तोंड देत होतं. संताजी-धनाजी, नेमाजी-खंडेराव हे गनिमी काव्याचे डाव टाकत मोठ्या मजला मारीत होते. बाळाजी विश्वनाथ फार जवळुन सगळ अनुभवत होता. १७०५ च्या दरम्यान त्याने देखिल आपली समशेर गाजवली आणि बहुतेक ती जस्तच परजली असावी कारण १६९९-१७०२ मध्ये बाळाजीला पुण्याची सुभेदारी मिळाली होती, आता त्याच बाळाजीला १७०५ च्या गुजरात स्वारीच्या दरम्यान दौलताबाद येथील सुभेदारी देखिल मिळाली. या सुभेदारीच्या काळातील बाळाजीची एक मुद्रा उपलब्ध आहे - "श्री उमाकान्त पदाभोजा भजनाप्रमुन्नते: बाळाजी विश्वनाथस्य मुद्रा विजयहेतराम।"

छ। राजारामांच्या अकाली निधनानंतर ’खेळणा’ उर्फ ’विशाळगडावर’ त्यांच्या ’शिवाजी’ या पुत्रास बसवले. ४ वर्षांचा मुलगा मराठ्यांचा छत्रपती झाला. पुढे ५-६ वर्षे मराठी सत्ता औरंग्याशी झुंजत होती. सातारा, परळी, सिंहगड, पन्हाळगड, विशाळगड असे किल्ले फितुरीने औरंगजेबाकडे आले. विशाळगडासाठी तर त्याने त्या काळी २ लाख रुपये मोजल्याचा पुरावा आहे. तर पन्हाळ्यासाठी त्याने ५० हजार रु. मोजले. १७०४ मध्ये त्याने राजगड व तोरणा घेतला. १७०२ मध्ये सिंहगडाच्या लढ्याच्यावेळी केवळ सामर्थ्य तोकडे पडले म्हणुन प्रदीर्घ लढ्यानंतर तडजोडीची बोलणी करायला मोगलांच्या छावणीत "बाळू पंडीत" म्हणजेच बाळाजी गेला होता. मात्र तत्पूर्वी किल्ला लढवत असताना "दारुगोळा कामी भासतोय, तरी त्वरा करा!" असे दारुगोळा पाठविण्या संबधीचे पत्र त्याने "अंबाजीपंत पुरंदरे" यांना लिहीलेले आढळते.

औरंगजेबाच्या मृत्युपश्चात शाहु महाराजांची सुटका झाली. या वेळी बाळाजीने शाहूंचा पक्ष घेतला. अर्थातच स्वराज्याच्या २ गाद्या तयार झाल्या. ताराराणींच्या पक्षातले अनेक जण बाळाजीने केवळ स्वत:च्या शब्दावर शाहू महाराजांच्या पक्षात आणले. राज्यकारभार चालवताना तुटलेली माणसे त्यांनी परत जोडली. जर शाहुंचा पाठिंबा लाभला तर आंग्रे सिद्दीशी सहज झुंजु शकतील हे आंग्र्यांना बाळाजीनेच पटवुन त्यांना शाहुंच्या पक्षात आणले. त्यांनी सय्यदबंधू बरोबर तह घडवुन आणला, मग त्यांच्याच सहाय्याने दिल्लीच्या फर्रुखसियर बादशहाला पदच्युत करुन रफिउद्दौरजात याला गादिवर बसवले. याच तहानुसार बाळाजींनी शाहुच्या पत्नींची सुटका करवुन घेतली. मात्र त्यावेळी २ गाद्यांमध्ये जीवघेणा संघर्ष उडु नये म्हणुन बाळजीने केलेली राजकारणे भल्याभयांच्या मतीला गुंग करणारी आहेत. आणि हे केवळ त्याने शब्द सामर्थ्यावर घडवुन आणले होते हे महत्वाचे. १७०७ पासुन पुढे १७२० पर्यंत म्हणजे मृत्युपर्यंत बाळाजीने छत्रपती शाहू महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली. छत्रपती शाहू महाराजांनीच बाळाजीला "पेशवेपद" दिले, अर्थात तो त्या योग्यतेचा होताच, आणि ते पद त्याने सहजगत्या पेलले.

राजे,एवढ भाग्य फक्त पदरात टाका...

इतिहास घडवणारी माणस इतिहास विसरु शकत नाही आणि इतिहास विसराणारी माणस इतिहास घडवू शकत नाही। मराठयांचा इतिहास सुवर्ण अक्षरानी लिहून ठेवावा असा तेजस्विनी इतिहास याच मातीत घडला. मात्र साक्षर मराठे यापासून विलगच राहिले ही आमची शोकान्तिका आहे .असो.... इतिहास जाणुन घेण्यासाठी गोष्टिच्या माध्यमाने सांगायला आणि ऐकायला देखिल आवडेल अशी खात्री बाळगतो ....आणि आज तुम्हाला॥छत्रपति शिवाजी महाराजनबद्द्ल एक कथा सांगतो..
शिवछत्रपती महाराजानी जीवन भर एकच वसा पेलला तो म्हणजे माणूस जोड्न्याचा ॥मराठयानी इतिहास घडविला परन्तु मराठयानी इतिहास लिहला नाही ।शिवाजिनी स्वराज्य उभे केले ते नेमके याच्याच बलावर ... निष्ठा माणस कशाच्या मोहने शिवाजी कडे आली....विश्वास दिला राज्यानी " आपल राज्य उभा करायचा " मला छत्रपती व्हायच म्हणून नाही ....तमाम मराठयांच राज्य निर्माण करायच, रयतेच राज्य गरीबांच राज्य तयार करायच आहे..ही काळजी इथल्या माणसा -माणसा मध्ये होती .... हिरोजी इंदलकर नावाचा बांधकाम प्रमुख शिवाजी महाराज्यानकडे होता.रायगड किल्ला बांधायची जबाबदारी राज्यानी त्याच्यावर सोपावली ...शिवाजी महाराज स्वारी वर गेले...हिरोजीने किल्ला निम्यावर बांधत आणला .. आणि पैसा संपला हिरोजिला समजेणा काय करावे ..शिवाजीने तर जबाबदारी टाकली आहे . किल्ला तर पूर्ण केला पाहिजे.. तर पैसा शिल्लक नाही त्या हिरोजिने अपूर्ण काम केले.आपला राहता वाडा , आपली जमिन विकली. बायकोसह रायगडावर आला.. पैशासह जोपड़ी घेऊन राहू लागला आणि मराठयांची राजधानी बांधून काढली .....
शिवाजीना आल्यावर कळल हिरोजिने काय केले । राज्याभिषेकाच्या वेळी त्या शिवाजिना वाटल या हिरोजिंचा सत्कार करावा ॥राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी म्हणाले, " हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधला , बोला तुम्हाला काय हवय." त्यावेळी हिरोजी नम्रपणे मान ज़ुकवुन म्हणाला ," महाराज , उभ स्वराज्य तुम्ही पदरात टाकल .. आम्हाला आणखी काय हवय...." महाराज म्हणाले नाही काही तरी मागितलेच पाहिजे ,त्यावेळी हिरोजी म्हणाला महाराज एक विनंती आहे ..रायगडावर आम्ही जगदिशवराचे मंदिर उभारल आहे .त्या जगदिशवराच्या एका पायरीवर आमच नाव कोरायची अनुमति आम्हाला दया . महाराजाना कलेना हे कसल मागण॥पगार वाढ नाही मागितली, देशमुखी नाही मागितली, पाटीलकी नाही मागितली , वतन नाही मागितल ...मागुन मागितले तर काय दगडावर नाव कोरयची परवानगी महाराजानी विचारल हिरोंजी अस का ...????आणि हिरोंजी उत्तर देतात, " राजे..! ज्या-ज्या वेळी रायगडावर असाल,त्या- त्या वेळी जगदिशवराच्या दर्शनाला तुम्ही याल... ज्या-ज्या वेळी दर्शनाला जाल ..त्या-त्या वेळी तुमची पाऊल त्या पायारीवर पडत जातील ...आणि महाराज त्यातल्याच जर एका पायरी वर माजे नाव कोरले असेल ..तर त्या- त्या वेळी तुमच्या पाऊलाची पायधूळ म्हणजे माज्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहिल.."राजे,एवढ भाग्य फक्त पदरात टाका...

हिंदूपतपातशाहीतील संक्रांतिची भयाण आठवण

आज संक्रांत. संक्रांतिचा दिवस म्हटला की मला आठवतो तो १० जानेवारी १७६० चा दिवस. यमुना नदीच्या काठचा बुराडी घाट. याच घाटावर अब्दाली, नजिबखान रोहिला आणि कुतुबशहाने दत्ताजी शिंद्यांवर छापा घातला. घनघोर रणसंग्राम झाला. जंबुर्‍याच्या गोळ्याने जखमी होवून दत्ताजी शिंदे पडले.दत्ताऽऽऽ" म्हणून कुतुबशहाने हाक दिली तसे दत्ताजींनी त्याच्यावर डोळे रोखले. जणू काही डोळ्यांतच अंगार फुटावा तसे डोळे भयंकर दिसू लागले. कुतुबशहा खिंकाळत म्हणाला," क्यूं पटेल, और लढोगेऽऽऽ?"आपला थंड पडत चाललेला आणि मंद मंद होत चाललेला आवाज दत्ताजींनी एकवटला आणि ते बाणेदारपणे उद्गारले,"क्यूं नही ? बचेंगे तो और भी लढेंगेऽऽऽऽ!"कुतुबशहा व नजिब चिडून दत्ताजींच्या उरावर जावून बसले अन् खंजीराने दत्ताजींची गर्दन चराचर चिरली. नजीब भाल्याच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला.त्या दिवशी दिवसभर मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता. कोंबड्या बकर्‍यांसारखी माणसं टिपून मारली जात होती. यमुना काठ रक्तानं निथळत होता.रात्रीच्या भयाण अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड बाहेर काढले. खिळखिळ्या झालेल्या तोफेचं लाकूड सामानं एकत्र केलं.यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडावाघडा देह झाकला. बटव्यातल्या सुपार्‍या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला, अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. भयाण रात्रीच्या घोंगावत्या वार्‍यात आणि यमुना नदिच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्याला. उघड्यावरच आग लावली.दिवशी महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ, रेवड्या वाटल्या जात होत्या. सणासुदीची माणसं भरपेट खाऊन उताणी झाली होती. तेव्हा कण्हेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळून पोसलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता !

--ओमकार

शिवरायांचा पाळणा:-

गुणी बाळ असा जागसि का रे वांया नीज रे नीज शिवराया अपरात्री प्रहर लोटला बाई तरि डोळा लागत नाही

हा चालतसे चाळा एकच असला तिळ उसंत नाही जिवाला निजयावयाचा हरला सर्व उपाय जागाच तरी शिवराय

चालेल जागता चटकाहा
असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका

का कष्टविसी तुझी सांवळी काया नीज रे नीज शिवराया १ ही शांत निजे बारा मावळ थेट शिवनेरी जुन्नर पेठ त्या निजल्या ना तशाच घाटाखाली कोकणच्या चवदा ताली ये भिववाया बागुल तो बघ बाळा किति बाई काळा काळा

इकडे हे सिद्दीजवान
तो तिकडे अफझुलखान
पलिकडे मुलूख मैदान
हे आले रे तुला बाळ धराया नीज रे नीज शिवराया २

प्रभो शिवाजीराजा

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा - स्वातंत्र्यवीर सावरकर